मुंबई : बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपासून करीत असले तरी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बंडखोरांवर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे भाजपकडूनही बंडखोरांवर कारवाईबाबत आस्ते कदम भूमिका घेण्यात येत आहे. बंडखोरांशी अद्याप चर्चा सुरू असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

भाजपच्या माजी खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावीत या अक्कलकुवा मतदारसंघातून शिंदे गटाच्या आमेश्या पाडवी यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र त्या आपल्या निर्णयावर कायम राहिल्या. त्यांच्यावर पक्षाने बडतर्फीची कारवाई करण्याआधीच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अहमदपूर मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने हाके यांनी जनसुराज्य पक्षातर्फे अर्ज भरला आहे.

हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

राज्यभरात काही भाजप नेत्यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार आहे. पण त्याआधीच काहींनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपने माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना पक्षाने ‘एबी अर्ज’ दिला आणि सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ठाम नकार दिला. सरवणकर यांना पक्षानेच अधिकृत उमेदवारी दिल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नसल्याचे बोलले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांवरच कारवाई करा…

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फडणवीस यांनी मलिक यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध करूनही पवार यांनी त्यास जुमानले नाही. त्यामुळे बंडखोरांवर कारवाई करायची असल्यास महायुतीतील तीनही पक्षांनी एक भूमिका घेऊन सर्वांवरच केली पाहिजे. शिंदे व अजित पवार गटाचा निर्णय होईपर्यंत भाजपनेही बंडखोरांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे, असे सूत्रांनी सांगितले.