भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत उत्तर प्रदेशात केवळ ५१ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. २३ जागांसाठीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सहा जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. खरं तर पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना पक्ष तिकीट देईल की नाही, याबाबत शंका आहे. दरम्यान, वरुण गांधी यांचे प्रतिनिधी दिल्लीहून पिलीभीत येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी नामनिर्देशनपत्रांचे ४ संच खरेदी केलेत आणि ते दिल्लीला परतलेत. भाजपाकडून तिकीट न मिळाल्यास वरुण गांधी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करू शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.
सध्या वरुण गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा जागेसाठी सत्ताधारी भाजपाकडून त्यांना तिकीट मिळण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. राज्यातील आठ जागांपैकी पिलीभीत ही सर्वात हाय प्रोफाइल जागा आहे, जिथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, ज्यासाठी बुधवारी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपा यंदा वरुण गांधींना उमेदवारी देण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे ते पिलीभीतमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. वरुण गांधींना भाजपाकडून तिकीट न मिळाल्यास आम्ही त्यांना तिकीट देण्याचा विचार करू शकतो, असेही समाजवादी पार्टीचे पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले.
बुधवारी रात्री उशिरा आणखी सहा उमेदवारांची सहावी यादी जाहीर करताना समाजवादी पार्टीने माजी मंत्री भागवत सरन गंगवार यांना पिलीभीत मतदारसंघातून उमेदवारी दिली. वरुणची आई आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी १९८९ मध्ये पिलीभीतमधून जनता दलाच्या उमेदवार म्हणून यशस्वीपणे निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्या १९९१ मध्ये पराभूत झाल्या होत्या, परंतु १९९६ मध्ये पुन्हा जनता दलाच्या तिकिटावरून त्यांनी ती जागा जिंकली होती. मनेका यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये अपक्ष म्हणून जागा जिंकली. २००४ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर या जागेवरून विजय मिळवला.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनेका यांनी वरुणसाठी जागा सोडली होती, ज्यांनी त्या जागेवरून दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. मनेका २०१४ मध्ये पिलीभीतमधून लढण्यासाठी परतल्या आणि सुमारे तीन लाख मतांनी विजयी झाल्या. २०१९ मध्ये वरुण गांधींनी भाजपाचे उमेदवार म्हणून पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवली आणि सपा उमेदवार हेमराज वर्मा यांचा सुमारे २.५ लाख मतांनी पराभव केला. पहिल्या टप्प्यात यूपीच्या इतर सात जागांवर मतदान होणार आहे, त्यात सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद आणि रामपूर यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये भाजपाने पिलीभीत, कैराना आणि मुझफ्फरनगर या तीन जागा जिंकल्या होत्या. बसपाला सहारनपूर, नगीना आणि बिजनौर या तीन जागा मिळाल्या होत्या, तर सपाने मुरादाबाद आणि रामपूर या जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने रामपूर जिंकला. यूपीमधील पहिल्या टप्प्यातील सहारनपूर ही एकमेव अशी जागा आहे, जी समाजवादी पार्टीने जागा वाटप करारानुसार काँग्रेसला दिली आहे.
हेही वाचाः पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाच्या आठवणीने झाले भावूक?
सहारनपूरमधून इम्रान मसूद हे पक्षाचे संभाव्य उमेदवार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. बसपाने अधिकृतपणे आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत, परंतु माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष माजीद अली यांना येथे उमेदवारी दिली जाणार आहे, असे संकेत दिले आहेत. २०१९ मध्ये बसपा नेते हाजी फजरुल रहमान यांनी ही जागा जिंकली होती, जेव्हा त्यांनी भाजपाच्या राघव लखन पाल यांचा सुमारे २० हजार मतांनी पराभव केला होता. रामपूरमध्ये भाजपा आणि सपाने अद्याप आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. २०१९ मध्ये समाजवादी पार्टीचे दिग्गज आझम खान यांनी ही जागा जिंकली होती, परंतु द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. २०२२ च्या पोटनिवडणुकीत भाजपाचे घनश्याम सिंह लोधी इथून विजयी झाले.
हेही वाचाः मोले घातले लढाया: अनिच्छेने दिल्लीच्या लढाईत
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नगीना मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. ते सपाबरोबर युती करून ही जागा लढवू शकतात, अशी अटकळ पूर्वी बांधली जात होती. मात्र, अशा चर्चांना पूर्णविराम देत सपाने मनोज कुमार यांना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवरून भाजपाने नेहतौरचे विद्यमान आमदार ओम कुमार यांना उमेदवारी दिली आहे. कैरानामध्ये भाजपाने पुन्हा विद्यमान खासदार प्रदीप चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. सपाने इक्रा हसन यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बसपाने माजी मंत्री धरमसिंग सैनी यांना या जागेवरून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. मुझफ्फरनगरमध्ये भाजपाने दोन वेळा विद्यमान खासदार सजीव बल्यान यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर सपाने हरेंद्र सिंग मलिक यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने या जागेवरून दारा सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
बिजनौरमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मलूक नागर यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या भरतेंद्र सिंह यांना सुमारे ७० हजार मतांनी पराभूत केले होते. भाजपाने त्यांच्या आघाडीचा भाग म्हणून RLD ला जागा दिली आहे, ज्याने तेथे चंदन चौहान यांना उमेदवारी दिली आहे. सपाने यशवीर सिंग यांना उमेदवारी दिली आहे, तर बसपा जाट नेते चौधरी विजेंद्र सिंग यांना उमेदवारी देऊ शकते, ज्यांनी अलीकडेच आरएलडीमधून बसपात प्रवेश केला आहे.