News Flash

डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत लक्ष घालावे

देशात करोना रुग्णसेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हल्ले होत आहेत.

आयएमएच्या राष्ट्रीय शाखेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन

पुणे : देशात करोना रुग्णसेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हल्ले होत आहेत. करोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय असतानाही लशीबाबत खोडसाळ माहिती पसरवण्यात येत आहे. या बाबी गंभीर असून पंतप्रधानांनी तातडीने यामध्ये लक्ष घालावे असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या राष्ट्रीय शाखेने सोमवारी आपल्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. करोना काळात देशातील रुग्णांच्या सेवेत डॉक्टर कोणतीही कसूर ठेवत नाहीत, मात्र तरीही सातत्याने डॉक्टरांना मानसिक आणि शारीरिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कायद्याचा धाक नसल्याने डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. हे हल्ले डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहेत. त्यांवर चाप आणण्यासाठी तातडीने वैद्यकीय आस्थापना विधेयक २०१९ लागू करावे, जेणेकरून रुग्णसेवेतील डॉक्टरांवर हल्ला करणारे आरोपी १० वर्ष कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरतील याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी या बाबीमध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत असे आयएमएने आपल्या पत्रात म्हटले आहे.

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. साथरोगावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र, लशीबाबत अफवा आणि गैरसमज पसरवण्याचा खोडसाळपणा समाजातील काही गट करत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

देशातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले तरच करोना विरुद्ध समूह प्रतिकारशक्ती येणे शक्य आहे. लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण न करता त्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, मात्र तसे घडताना दिसत नाही. के वळ लसीकरणच नव्हे तर शास्त्रीय संशोधनाअंती आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाची मान्यता न मिळवलेल्या कोणत्याही औषधाची जादूची कांडी म्हणून प्रचार आणि प्रसार करणाऱ्यांवर सरकारने आळा घालावा, असे आयएमएने आपल्या पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:08 am

Web Title: attacks doctors corona virus ssh 93
Next Stories
1 द्विसदस्यीय प्रभागाबाबत महाविकास आघाडीतील शिवसेनेचा वेगळा सूर
2 खड्डय़ांबाबत तक्रारीसाठी महापालिके त स्वतंत्र कक्ष
3 निर्बंध शिथिल झाल्यानंतर खरेदीसाठी झुंबड
Just Now!
X