युगधर्म तयार करतात ते युगपुरुष असतात. सर्वसामान्यांतील पौरुष जागे करून त्यांच्याकडून असामान्य कृती करून घेणारे डॉ. बाबा आमटे हे युगपुरुष आहेत, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली. वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे आव्हानांवर मात करणारे आनंदवन हे खऱ्या अर्थाने प्रयोगवन ठरले, असेही त्यांनी सांगितले.
समकालीन प्रकाशनतर्फे डॉ. विकास आमटे यांनी लिहिलेल्या ‘आनंदवन-प्रयोगवन’ या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि डॉ. भारती आमटे या वेळी उपस्थित होत्या. विक्रम गोखले यांनी ‘आनंदवन’च्या कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश फडणवीस यांच्या हस्ते विकास आमटे यांच्याकडे सुपूर्द केला.
फडणवीस म्हणाले, हे पुस्तक आनंदवनातील ‘रिअल हिरों’ची आणि तेथील प्रत्येक घटनेची कहाणी आहे. बाबांनी काम सुरू केले तेव्हा प्रारंभी विरोध झाला. विरोध कमी झाल्यावर उपहास होतो. पुढे कार्य रुजल्यावर मान्यता मिळते. आमटे कुटुंबीयांनी कुष्ठरुग्णांना केवळ उपचारांनी बरे केले असे नाही. तर, शेती, फळबागा, वस्त्रोद्योग निर्मिती या माध्यमातून त्यांना आपल्या पायावर उभे करणाऱ्या आनंदवन, सोमनाथ, मूलगव्हाण, अशोकवन येथील कार्यासह लोकबिरादरी प्रकल्प हा प्रवास या पुस्तकातून उलगडला आहे. शिक्षण नसतानाही येथील प्रत्येक माणूस मॅनेजमेंट गुरू झाला आहे. अशा पद्धतीने समाजामध्ये कल्पकता आणि नावीन्याचा ध्यास सतत घेतला जात आहे. आनंदवनाचे स्वावलंबनाचे मॉडेल समजून घेत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविले तर समाज परिवर्तन घडू शकेल. समाज कार्यातून परिवर्तन घडविणाऱ्या आमटे यांच्या तीन पिढय़ांच्या कामामध्ये आपल्याला ईश्वराचे दर्शन घडते.
विक्रम गोखले म्हणाले, बाबांचा वारसा पुढे नेणारी शक्तिमान पिढी हे भारतीय समाजावरचे मोठे ऋण आहे. ज्यांचा चांगुलपणा, मानवता, संस्कारांवर विश्वास आहे त्यांना हे पुस्तक वाचल्यानंतर गीता, बायबल आणि कुराणमधील ज्ञान मिळेल.
डॉ. तात्याराव लहाने यांनी आनंदवनमध्ये केलेल्या नेत्रशस्त्रक्रिया शिबिरांची माहिती दिली. आनंद अवधानी यांनी प्रास्ताविक केले.