समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन उच्चपदस्थ झालेल्या दलितांनी मागे वळून पाहिलेच नाही, अशी खंत प्रसिद्ध साहित्यिक रामनाथ चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली.
अॅड. डी. बी. सोनावणे यांच्या ‘दलितातील नोकरशाही’ या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी रामनाथ चव्हाण बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विजयराव सावंत, सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. शारदा वाडेकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लीगल फाउंडेशनचे संस्थापक अॅड. पी. एस. कांबळे आणि वीरेंद्र शहा या वेळी उपस्थित होते.
रामनाथ चव्हाण म्हणाले, भारतीय जातिव्यवस्थेमुळे जात चोरणे आणि सवर्णाचे अनुकरण करणे यामध्येच दलित बांधव धन्यता मानतात. यामध्ये कोणताही माणूस मोकळा श्वास घेऊ शकत नाही. हा देश विविधतेने नटला आहे म्हणायचे की विषमतेने गांजलेला हाच खरा प्रश्न आहे. एरवी जाती निर्मूलनाच्या गप्पा करणारे निवडणुकीच्या वेळेस जातीच्या मतपेढीची चर्चा करतात. भूक भागविण्याच्या स्पर्धेत दलितांचाही बळी जातो हे वास्तव नाकारता येणार नाही.
आरक्षणाचा लाभ घेतलेल्या नोकरशाहीमध्ये आंबेडकरी चळवळीतील संस्कार रुजलेच नाहीत याकडे लक्ष वेधून व्ही. व्ही. बांबर्डे म्हणाले, एकीकडे आरक्षणरूपी सोन्याच्या पिंजऱ्यात दलित समाज सुरक्षित असला, तरी नोकरशहा वर्ग जबाबदारीने वागत नाही. या पुस्तकामध्ये सोनावणे यांनी खरा नोकरशहा मांडला आहे.
डी. बी. सोनावणे यांनी लेखनामागची भूमिका प्रास्ताविकात मांडली. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.