पिंपरी चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील संतप्त नागरिकांनी जुना मुंबई-पुणे महामार्गावर हांडे आणि बादलीसह ठिय्या मांडला. तब्बल एक तास महामार्ग रोखून धरला होता. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असतो. नेहमी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. या आंदोलनामुळे यात भर पाडून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पिंपरी-चिंचवड मध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या आहे शहरातील विविध भागात पाणी कमी दाबाने येते तर कुठे दोन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. या समस्येवरून अनेकवेळा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. मात्र पाणी प्रश्न काही सुटत नाही. एवढंच नाही तर अनेक वेळा आयुक्तांच्या निवासस्थानी हांडे मोर्चे निघालेले आहेत.

फुगेवाडीत गेल्या चार दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले होते. वारंवार पालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही हा प्रश्न सुटलेला नाही. अखेर नागरिकांनी आणि नगरसेवकांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावर ठिय्या मांडला. सकाळी सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत नागरिकांनी रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच गेल्या सहा-सात महिन्यांपासून पाण्याच्या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यावेळी नगरसेवक स्वाती काटे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेवक राजू बनसोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यासंदर्भात पाणीपुरवठा अधिकारी राम तांबे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, नाशिक फाटा येथे फुगेवाडीकडे येणारी लाईन आहे. तेथील वॉल हा नादुरुस्त होता. तो उघडत नव्हता. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र तो वॉल दुरुस्त करण्यात आला असून १२ वाजेपर्यत पाणी सोडण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली.