चाचण्यांमध्ये देशात पुणे अग्रणी

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २२ दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा दर हा तीन टक्के  एवढा आहे, तर प्रति दहा लाख लोकसंख्येमागे दैनंदिन चाचण्यांमध्ये गेल्या सव्वा महिन्यापासून पुणे देशात अग्रणी आहे. येत्या तीन ते चार आठवडय़ांमध्ये पुण्यातील करोना रुग्णांचा आलेख खालावण्याची शक्यताही प्रशासनाकडून सोमवारी व्यक्त करण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात २५ जूनपासून दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत असून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. परिणामी २५ जूनपासून आतापर्यंत दररोज शहरासह जिल्हाभरात करोना रुग्णांची संख्या मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत जास्त दिसत आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून प्रति दहा लाख लोकसंख्येमागे दैनंदिन चाचण्यांमध्ये पुणे देशात आघाडीवर आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण महाराष्ट्रात ३९१, मुंबईमध्ये ६१२, तर पुण्यात ९१९ एवढे आहे.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त राव बोलत होते. ते म्हणाले, दैनंदिन चाचण्यांमध्ये बाधित सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २१ टक्के  एवढे आहे. सध्या पुण्यातील करोना रुग्णवाढीचा दर तीन टक्के  एवढा आहे, तर मुंबईचा एक टक्का आहे. गेल्या आठवडय़ाचा विचार के ल्यास पुण्यात २४ टक्के , तर मुंबईत १४ टक्के  एवढी रुग्णवाढ झाली. म्हणजेच मुंबईत १४ जून रोजी असणारी स्थिती पुण्यात २६ जुलै रोजी होती, असा प्रशासनाचा निष्कर्ष आहे. ऑगस्ट अखेरीला करोना विषाणूच्या रचनेत बदल होऊन त्याच्या वर्तनात फरक पडेल. जेणेकरून येत्या तीन ते चार आठवडय़ांमध्ये पुण्यातील करोनाचा आलेख नक्की कमी होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या वेळी व्यक्त के ला.

सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष १२ ऑगस्टपर्यंत

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) मदतीने सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये शहरी व झोपडपट्टी भागांचा समावेश आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष १२ ऑगस्टपर्यंत प्रशासनाला प्राप्त होतील. त्यानुसार रोगाचा प्रसार व आगामी काळात संसर्गाचे चित्र काय राहील?, याबाबत नेमकी माहिती प्राप्त होईल, असेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

मोठय़ा करोना काळजी केंद्राचे काम सुरू

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि पिंपरी-चिंचवडमधील मगर मैदान येथील मोठय़ा करोना काळजी केंद्राचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही केंद्रांत प्रत्येकी ६०० प्राणवायू आणि २०० अतिदक्षता खाटा असतील. ही केंद्रे १९ ऑगस्टपर्यंत कार्यरत करण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेके दार कं पनीला देण्यात आले आहे. सीओईपीमधील प्राणवायूच्या खाटा असणाऱ्या विभागात वातानुकू लित यंत्रे बसवण्यात येणार आहेत. केंद्रांमध्ये डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक, इतर कर्मचारी असे एकूण २०० मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे.