पिंपरी चिंचवडच्या ESIC रुग्णालयातला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातल्या ३० करोना रुग्णांनी त्यांना दिलेलं जेवण फेकून दिलं आहे. या जेवणात अळ्या आणि माशा आहेत अशी तक्रार या रुग्णांनी केली आहे. त्याचमुळे त्यांनी हे जेवण फेकून दिलं आहे. या रुग्णालयातल्या रुग्णांना दिलं जाणारं जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. पोळ्यांचा दर्जा, भात, वरण, भाजी हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. असं अन्न खाऊन रुग्णांना जुलाब, अतिसार यासारखे त्रासही होत आहेत अशी तक्रार येथील रुग्णांनी नोंदवली आहे. त्यामुळेच या रुग्णालयातल्या जेवणावर रुग्णांनी बहिष्कार घातला आहे.

आम्ही इथल्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत तोंडी, लेखी तक्रार केली. मात्र रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही कृती केली नाही. आम्हाला देण्यात येणारं जेवण हे सातत्याने निकृष्ट दर्जाचं, अळ्या आणि माशा असलेलं होतं. असलं जेवण जेवून अनेक लोकांना पोटाचे विकार जडले आहेत असंही काही रुग्णांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून मी या रुग्णालयात दाखल आहे. नऊ पैकी एकही दिवस असा आठवत नाही ज्या दिवशी मला चांगलं जेवण मिळालं असंही एका रुग्णाने म्हटलं आहे. दुसऱ्या रुग्णानेही अशाच प्रकारची तक्रार केली आहे. एक महिला तिच्या दोन मुलांसह या रुग्णालयात दाखल झाली आहे. आम्हाला ज्या चपात्या देण्यात आल्या त्यांचा दर्जा निकृष्ट होता. तसं डाळ आणि भाजी या दोन्हीमध्ये अळ्या होत्या. तर जो भात दिला गेला त्याला वास येत होता असंही या महिला रुग्णाने सांगितलं आहे.