करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय

पुणे : करोना संसर्गामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या ७५ टक्के  उपस्थितीबाबतचा निर्णय पहिल्या सत्रासाठी शिथिल करण्याबाबतचा अधिकार महाविद्यालय, विद्यापीठाच्या विभाग प्रमुखांना देण्यात आला आहे. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने त्याबाबत परिपत्रकाद्वारे निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २५ टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने, तर ७५ टक्के  अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्गात पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत परस्पर अंतर, विद्यार्थी सुरक्षा, आरोग्य विचारात घेऊन अद्यापही प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. तसेच महाविद्यालये कधी सुरू करता येतील याबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही. या परिस्थितीमुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांची भौगोलिक परिस्थिती, त्यांच्याकडील साधनांची उपलब्धता विचारात घेता विद्यार्थ्यांना सर्व तासिकांना उपस्थित राहण्यात मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती भरण्यात अडचणी आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या किमान उपस्थितीबाबतची टक्के वारी लक्षात घेऊन टाळेबंदीचा कालावधी विद्यार्थ्यांचा उपस्थिती कालावधी म्हणून ग्रा धरण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या आहेत.

या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ अध्यादेश क्र. ६८ मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांच्या किमान ७५ टक्के  उपस्थितीबाबतची अट शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पहिल्या सत्रात शिथिल करण्याबाबत विद्यापीठातील विभागांचे विभागप्रमुख, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्था यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट के ले आहे.