करोना संसर्गामुळे जिल्ह्य़ातील व्यापारी पुण्यात मार्केटयार्डातील भुसार बाजारात खरेदीसाठी येत नाहीत आणि नेहमीच्या तुलनेत तूरडाळीला १५ ते २० टक्के मागणी असली तरी किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी पार केली आहे. मात्र मोठय़ा व्यापाऱ्यांकडून तूरडाळीची खरेदी सुरू करण्यात आल्याने तूरडाळीच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. आठवडाभरात घाऊक बाजारात तूरडाळीच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सध्या घाऊक बाजारात तूरडाळीच्या क्विंटलचा दर ८ हजार १५० ते ८ हजार ८०० रुपये दरम्यान आहे. व्यापारी तसेच ग्राहकांकडून मागणी वाढल्यास तूरडाळीच्या दरात आणखी वाढ होण्याची  शक्यता मार्केटयार्ड भुसार बाजारातील व्यापारी नितीन नहार यांनी व्यक्त केली. घाऊक आणि किरकोळ बाजारात नेहमीच्या तुलनेत तूरडाळीला मागणी तशी कमी आहे. मागणी नसल्याने व्यापारी गरजेएवढीच तूरडाळ खरेदी करत आहेत. बाजारात लातूर, नांदेड, बार्शी,सोलापूर येथून तूरडाळीची आवक होते.सध्या करोनाचा संसर्ग असल्याने तूरडाळीची आवक नेहमीच्या तुलनेत कमी होत आहे. एरवी मार्केटयार्डातील भुसार बाजारात दररोज ५० टन तूरडाळीची आवक होते,असे त्यांनी नमूद केले.

येत्या काही दिवसात तूरडाळीचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे मोठे व्यापारी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठया प्रमाणावर तूरडाळीची खरेदी सुरू केली आहे. शहरातील हॉटेल, खाणावळी बंद आहेत. वाहतुकीवर निर्बंध असल्याने बाहेरगावचे व्यापारी शहरात खरेदीसाठी येत नाहीत. शहरातील काही भागात निर्बंध आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर तूरडाळीची मोठय़ा प्रमाणावर खरेदी सुरु होईल, असे नहार यांनी सांगितले.