पुणे-सातारा रस्त्यावर नवीन कात्रज बोगद्यामध्ये रसायन घेऊन निघालेल्या टेम्पोला आग लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आगीमध्ये टेम्पो पूर्णपणे खाक झाला. सुदैवाने त्यात कुणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पुणे-सातारा रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नऱ्हे आंबेगाव येथून रसायन घेऊन हा टेम्पो सातारा औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता. पुणे-सातारा रस्त्यावर नवीन बोगद्यामध्ये टेम्पो आला असताना इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे टेम्पोच्या पुढील भागात आग लागली. हा प्रकार लक्षात येताच चालकाचे टेम्पो थांबवला व तो दूर गेला. याबाबत तातडीने अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. टेम्पोमध्ये रसायन असल्याने आग लगेचच भडकली. सिंहगड रस्ता अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र, तोवर टेम्पो खाक झाला होता.
आगीमुळे बोगद्यात धूर पसरल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. सुमारे दोन तास या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने जळालेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतला. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास वाहतूक सुरळीत होऊ शकली.