शहाजीराजांनी दूरदृष्टीने वसविलेल्या ‘खेडेबारे’ म्हणजेच सध्याच्या खेड शिवापूर येथील छत्रपती शिवराय यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकार कोटय़वधी रुपये खर्चून अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारत असतानाच या वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, याकडे वेल्हे येथील आनंद मारुतीराव गोरड यांनी लक्ष वेधले आहे.
या वाडय़ामध्ये शहाजीराजांचे कुटुंबीयांसमवेत काही काळ वास्तव्य होते. याच वाडय़ामध्ये स्वराज्य स्थापनेपूर्वी सर्व सरदारांना बोलावून दोन दिवस स्वत: शहाजीराजांनी जिजामाता आणि बाल शिवाजी यांच्या उपस्थितीत स्वराज्य स्थापनेबाबतच्या जबाबदाऱ्यांबाबत विस्तृत चर्चा केली होती. स्वराज्यातील पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, सरदेशमुख, वतनदार, तसेच मावळे या सर्वाबरोबरच प्रजेमध्ये स्वराज्याविषयीची उत्कट इच्छा या वाडय़ातील वास्तव्यातून निर्माण केली आहे. स्वराज्य स्थापनेमध्ये आणि ते वाढविण्यामध्ये या वाडय़ाचे अमूल्य योगदान आहे. स्वराज्य स्थापनेच्या काळातील महत्त्वाच्या घडामोडींचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या या वाडय़ाची दुरवस्था पाहून मन हेलावून जाते, असे आनंद गोरड यांनी सांगितले. हजारो पर्यटक, भाविक खेड-शिवापूर येथील दग्र्यास दररोज भेट देत असतात. पण, या वाडय़ाविषयी कल्पना नसल्यामुळे वास्तूला भेट देण्यासाठी कोणीच जात नाही. त्यामुळे नामशेष होण्याआधी या पवित्र वास्तूचे सरकारने जतन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
शिवरायांचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था
शहाजीराजांनी दूरदृष्टीने वसविलेल्या ‘खेडेबारे’ म्हणजेच सध्याच्या खेड शिवापूर येथील छत्रपती शिवराय यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झाली आहे.

First published on: 02-04-2013 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical residence where shivrai use to live in khed shivapur now in worse condition