सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर पाच वर्षे मुदतीचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून या अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासह विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही (यूजीसी) मान्यता मिळाली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.

संरक्षण आणि सामरिक शास्त्र या विषयात उपलब्ध असलेले बहुतांश अभ्यासक्रम हे पदवी, पदव्युत्तर किंवा प्रमाणपत्र प्रकारातील आहेत. मात्र, विद्यापीठाने पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा पहिला मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.

संरक्षणशास्त्र विषयातील राज्यभरातील तज्ज्ञांसह देशभरातील तज्ज्ञांनी मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर सध्या सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू राहणार आहे.

विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी या अभ्यासक्रमाची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. ‘पदवी आणि पदव्युतर पदवी मिळून एकूण दहा सत्रांचा हा अभ्यासक्रम आहे. बारावीत कला आणि वाणिज्य शाखा असलेल्या विद्यार्थ्यांला एम. ए. आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांला एम. एस्सी पदवी मिळेल.

या अभ्यासक्रमातून संरक्षण क्षेत्रासाठी सक्षम थिंक टँक तयार करण्याचा उद्देश आहे. येत्या काळात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात तज्ज्ञांची गरज निर्माण होईल.

हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सशस्त्र दलांतील प्रशासकीय जागा, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते. रोजगाराभिमुख पद्धतीनेच अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

भारतात अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन अनुदान देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे,’ असे डॉ. खरे यांनी सांगितले.

विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा अभ्यासक्रम आहे. सैन्यदलाशी संबंधित तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्राशी संबंधित सर्वसमावेशक ज्ञान या अभ्यासक्रमातून प्राप्त होईल.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अभ्यासक्रमाची वैशिष्टय़े

*  इंग्रजी भाषा

*  स्थानिक ते जागतिक पातळीवरील संरक्षण आणि सामरिकशास्त्र संकल्पना

*  संरक्षण क्षेत्राशी संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञान

*  विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा

*  संरक्षण आणि सामरिकशास्त्राचे विविध पैलू

*  पररराष्ट्र धोरण

*  राष्ट्रीय संरक्षण संस्था

*  सायबर सुरक्षा

*  देशांतर्गत सुरक्षा

*  क्षेत्रभेटी, कार्यपरिचय