आम्हाला सध्या राजकारणापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की, राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाविकासघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. बदल्यासंदर्भात जे काय सुरू आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत म्हणाले.

यावेळी फडणवीस यांनी पार्थ पवार, संजय राऊत, सुशांत सिंह राजपूत, बिहार निवडणुकीची जबाबदारी आदींवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत, अशी मागणी केली असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, अँटीजन टेस्ट आपण करतो आहोत, त्या देखील योग्य आहेत. परंतु, ज्या आपल्या आरटीपीसीआर टेस्ट आहेत, त्याची क्षमता वाढवून आरटीपीसीआर व अँटीजन यांचा रेषो तो आता एका आरटीपीसीआरच्या मागे दोन अँटीजन टेस्ट करतो. त्या ऐवजी आपल्याला एकास एक कसं करता येईल, त्यासाठी आपल्याला आरटीपीसीआर टेस्ट कशा वाढवता येईल, याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं की. हा जो संसर्ग आहे तो आपण नियंत्रणात आणू शकू. संसर्गाचे प्रमाण कमी करू शकू व मृत्यू दर नियंत्रणात आणता येईल.

महाविकासआघाडीच्या कारभाराबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, मी सातत्याने सांगतो आहे की त्यांनी सरकार नीट चालवावं. मात्र आता त्यांच्यात अंतर्गत एवढी भांडण सुरू आहे की त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. विशेषता बदल्यांच्या संदर्भात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. त्याबद्दल जे काही ऐकायला मिळत आहे ते त्याही पेक्षा भयानक आहे. खरं म्हणजे करोनाच्या परिस्थिती बदल्या केल्या नसत्या तरी देखील चाललं असतं. परंतु १५ टक्के बदल्या करण्याची जी काही मुभा दिली व त्यातून एवढ्या मोठ्याप्रमाणवर बदल्या सुरू आहेत. शेवटी बदल्यांना देखील पैसा लागतो, ज्यांच्या तुम्ही बदल्या करता त्यांना भत्ता द्यावा लागतो. त्यामुळे हा अनाठायी खर्च सुरू आहे. या संदर्भात ज्या काही अर्थपूर्ण बोलण्या सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहे, या मात्र अत्यंत गंभीर आहेत.

पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले असता फडणवीस म्हणाले की, पार्थ पवारांचा जो काही विषय आहे, तो पवार घराण्याचा कौटुंबिक विषय आहे. आम्हाला त्या विषयात पडायचं नाही. त्या विषयाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. तो विषय त्यांच्या परिवारातील आहे, त्यांनी तो परिवारात सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसेच, या संदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून टोला लगावत, संजय राऊत अनेक गोष्टी बोलत असतात मात्र ते बोलत असलेल्या सर्व गोष्टी खऱ्या थोडी असतात असे म्हटले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्र की बिहार पोलिसांवर विश्वास आहे? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी महाराष्ट्र पोलिसांसोबत पाच वर्षे काम केले आहे. पोलिसांमधील कामाची क्षमता मला माहिती असून आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील जबाबदारी तुमच्यावर देण्यात आली आहे. याबद्दल विचारण्यात आले असता फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेत्यांना वेगवेगळया राज्यांची जबाबदारी देण्यात येत असते. त्यानुसार माझ्यावर बिहार राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीचे तिथे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.