‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषू सर्वदा’ उपक्रमातील मदतीबद्दल कृतज्ञता
स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशनच्या ‘आपलं घर’या संस्थेच्या वतीने निराधार मुला-मुलींसाठी डोणजे भागातील गोळेवाडी येथे नव्या वसतिगृहाची उभारणी करण्यात आली असून, त्याचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या वास्तूच्या उभारणीमध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषू सर्वदा’ उपक्रमातून मिळालेल्या मदतीचा मोठा वाटा असल्याने त्याबाबत या वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वसतिगृहाचे उद्घाटन आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष विजय फळणीकर, आनंदी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ, बाळासाहेब टेमकर आदी या वेळी उपस्थित होते.
फाउंडेशनच्या वतीने गोळेवाडी आणि डोणजे परिसरातील १६ गावांमध्ये मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. दानशूर लोकांच्या साहाय्याने हा उपक्रम सुरु आहे. मात्र रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डायलेसिस आणि सिटी स्कॅन सारख्या खर्चिक आरोग्य सुविधाही मोफत पोहोचिवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र पक्का रस्ता नसल्यामुळे ही योजना अद्यापही कार्यान्वित होऊ शकलेली नाही, याकडे विजय फळणीकर, श्रीराम बेडकिहाळ यांनी या वेळी लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यातून रस्त्याची मागणी करण्यात आली. हा धागा पकडून मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, रस्ता करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. जिल्हा नियोजन समिती आणि ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
विजय फळणीकर यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून झालेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ‘सर्व कार्येषू सर्वदा’या सामाजिक उपक्रमातून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळेच ही नवी वास्तू होऊ शकली, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त डॉ. मंदार परांजपे यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 6:22 am