सनई-चौघडय़ाचे मंगलमय सूर.. नयनरम्य रंगावलीच्या पायघडय़ा.. ताशाच्या तालावर होणारा ढोलांचा दणदणाट.. विविध प्रांतांच्या संस्कृतीची ओळख करून देणारा नृत्याविष्कार.. साहसी क्रीडाप्रकारांची बहारदार प्रात्यक्षिके.. पथनाटय़ातून दिला जाणारा सामाजिक संदेश.. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राजकीय नेत्यांची झालेली भाऊगर्दी.. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर.. दुपारी झालेल्या मुसळधार पावसामध्येही ढोल-ताशा वादनाचा आनंद लुटणारे उत्साही वादक कलाकार .. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. जोरदार पावसामुळे मिरवणूक मार्गावर दुतर्फा असणारी भाविकांची गर्दी कमी झाली तरी, ढोल-ताशा पथकातील वादक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ठीक साडेदहा वाजता पुण्यनगरीच्या वैभवशाली मिरवणुकीचा प्रारंभ झाला असला तरी, मानाच्या पाच गणपतींचे विजर्सन सायंकाळीच झाले.
श्री कसबा गणपती
महापौर चंचला कोद्रे यांनी पुष्पहार अर्पण केल्यावर मंडईतील टिळक पुतळ्यापासून ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक साडेदहाला सुरू झाली. पालकमंत्री अजित पवार, खासदार सुरेश कलमाडी आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ या वेळी उपस्थित होते. अग्रभागी असलेला सुभाष देवळाणकर यांचा नगारावादनाचा गाडा, ‘व्होट फॉर ए बेटर इंडिया हा संदेश देत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे श्रीश्री रविशंकर प्रणीत ‘आर्ट ऑफ लिव्िंहग’च्या कार्यकर्त्यांचे पथक, कामायनी प्रशालेचे घोषपथक, रोटरी क्लबच्या ‘युथ एक्स्चेंज प्रोग्राम’अंतर्गत पुण्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या परदेशी युवक-युवतींचे पथक, रमणबाग युवा मंचचे ढोल-ताशा पथक आणि प्रभात बँडपथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक चांदीच्या पालखीमध्ये विराजमान झालेल्या श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
श्री तांबडी जोगेश्वरी
नगारावादनाचा गाडा ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी होता. संगीताच्या तालावर नर्तन करणारे दोन अश्व गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. नऊवारी आणि नथ अशा पारंपरिक पेहरावातील अश्वारुढ युवतींचे पथक, देशभक्तिपर आणि भक्तिगीतांच्या सुरेल सुरावटी साकारणारे न्यू गंधर्व बँडपथक, वेगेवेगळ्या तालांवर गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करणारी ‘शिवमुद्रा’ आणि ‘ताल’ ही दोन ढोल-ताशा पथके या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान श्रींच्या मूतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. मंडळाचे कार्यकर्ते हेच या पालखीचे भाई झाले होते.
गुरुजी तालीम मंडळ
लक्ष्मी रस्त्यावर प्रथम गुलाल उधळणारे मंडळ असा लौकिक असलेल्या श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या मंडळाने यंदा मर्यादित प्रमाणात गुलालाचा वापर केला. सुभाष सरपाले यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेल्या राज सिंहासन रथामध्ये मूषकस्वार गणराय विराजमान झाले होते. लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकातील विद्यार्थ्यांनी विविध प्रांतातील लोकनृत्यासह साहसी क्रीडाप्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली. तालासाठी प्रसिद्ध असलेली ‘नादब्रह्म’ आणि ‘शिवगर्जना’ ही दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांचा या मिरवणुकीमध्ये सहभाग होता.
तुळशीबाग मंडळ
कार्यकर्त्यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पुष्परथामध्ये श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मानाचा चौथा गणपती विराजमान झाला होता. पुणे डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्यविषयक जनजागृती करणारा डॉक्टरांचा सहभाग असलेला आरोग्य रथ मिरवणुकीच्या अग्रभागी होता. त्याचप्रमाणे सहजयोग परिवारचे कार्यकर्ते योग-ध्यानधारणा आणि प्राणायाम याविषयी जागृती करणारे फलक हाती घेत सहभागी झाले होते. यातील काही कार्यकर्त्यांनी पथनाटय़ सादर केले. गजलक्ष्मी, स्व-रूपवर्धिनी आणि हिंदू तरुण मंडळ ही तीन ढोल-ताशा पथके या मिरवणुकीचे आकर्षण केंद्र ठरली.
केसरीवाडा गणपती
टिळक रस्त्याचा शिरस्ता मोडून ‘केसरीवाडा’ हा मानाचा पाचवा गणपती सलग दुसऱ्या वर्षी लक्ष्मी रस्त्याने मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी होता. शौर्य, शिवमुद्रा आणि श्रीराम पथक ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान झालेली श्रींची मूर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. भर पावसामध्येही ढोल-ताशा वादनाचा आनंद लुटणारे वादक आणि गणपती बाप्पा मोरया हा गजर करणारे कार्यकर्ते यांच्या उत्साहामुळे मिरवणुकीमध्ये रंग भरला गेला. केसरीवाडा गणपतीचे विसर्जन यंदा अर्धा तास आधीच झाले.