माथाडी कायद्याचा गैरवापर  करून धमकावण्याचे प्रकार

पुणे: राज्यात माथाडी कामगार कायद्याचा काही जणांकडून गैरवापर करण्यात येत आहे. खंडणीसाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना धमकावण्यात येत असून खंडणीखोरांवर कारवाईची मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी केली आहे.

याबाबत संचेती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नुकतेच निवेदन दिले आहे.  हमाल, कामगारांच्या हिताच्या दृष्टीने माथाडी कामगार कायदा तयार करण्यात आला आहे. त्याचा लाभ अनेक कामगारांना झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या कायद्याचा राज्यात दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे व्यापारी आणि कारखानदार त्रस्त झाले आहेत. ज्या ठिकाणी हमाल काम करत आहे त्या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. मार्केटयार्ड, मालधक्का अशा क्षेत्रात या कायद्याचा वापर करण्यात यावा. या कायद्यात काही सुधारणा करणे गरजेचे आहे, याकडे संचेती यांनी लक्ष वेधले आहे.

माथाडी कामगार कायदा औद्योगिक क्षेत्रासाठी लागू करण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी मोठय़ा संख्येने हमाल कार्यरत आहेत अशा क्षेत्रात हा कायदा लागू करण्यात यावा. राज्यातील अनेक  जिल्ह्य़ात माथाडी मंडळ (बोर्ड) अस्तित्वात नाहीत. काही ठिकाणी माथाडी मंडळात एकच सदस्य आहेत, त्याचाही दुरुपयोग होत आहे. त्यामुळे माथाडी मंडळ त्वरित अस्तित्वात यावेत.कामगार संघटना आणि माथाडींच्या माध्यमातून उद्योजकांना खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. काही नेत्यांच्या आशीर्वादाने काही कामगार संघटना आणि माथाडी संघटना उद्योजक आणि कामगारांना धमकावत आहेत. सध्या जे कामगार  काम करत आहेत त्यांना आमच्या संघटनेचे काम करायला सांगा, अशा धमक्या देण्यात येत आहेत, असे संचेती यांनी निवेदनात नमूद केले आहे.

माथाडी कामगार कायदा महाराष्ट्र राज्याच्या मंडळावर मी गेले वीस वर्ष  कार्यरत होतो. हा कायदा तयार करण्यात आला, त्या वेळी मी या समितीवर कार्यरत होतो. मी आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत हा कायदा लागू झाला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या कायद्याचा दुरुपयोग होत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.