पुणे : टिंबर मार्केट भागातील व्यापाऱ्याच्या मुलाचे वीस कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या टोळीतील सराईतांविरोधात पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. अपहरण करणाऱ्या सराईतांविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहनचोरी, खंडणी, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

शाहबाज फिरोज खान (वय २८), सुयश राजू वाघमारे (वय २६), अरबाज फिरोज खान (वय २७, तिघे रा. भवानी पेठ), फरदीनपरवेज खान (वय १९), साहिल अब्दुल शेख (वय २३, दोघे रा. कोंढवा खुर्द), सुरज लक्ष्मण चव्हाण (वय २९, रा. वडकी नाला, सासवड रस्ता) अशी कारवाई करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत. भवानी पेठ भागातील टिंबर मार्केट परिसरात एका व्यापाऱ्याच्या मुलाचे वीस कोटींच्या खंडणीसाठी सहा ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आले होते.

खडक पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करून अपहरण करणारे आरोपी खान, वाघमारे, शेख, चव्हाण यांना पकडले. त्यांच्या तावडीतून व्यापाऱ्याच्या मुलाची सुटका करण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, महेश बारावकर, दीपक मोघे यांनी तपास करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत शाहबाज खान आणि साथीदारांविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन कारवाईचे आदेश दिले.