आदर्श मित्र मंडळ, धनकवडी

धनकवडीतील आदर्श मित्र मंडळ हे वर्षभर सक्रिय असलेले मंडळ आहे आणि मंडळातर्फे गेले दीड वर्ष नक्षलग्रस्त भागात अग्निपंख, भरारी, ज्ञानगंगा असे उपक्रम राबविले गेले आहेत. नक्षलवादी, त्यांचे कुटुंबीय आणि नक्षली कारवायांमध्ये होरपळलेल्यांसाठी आदर्श मित्र मंडळ गडचिरोली पोलिसांच्या साहाय्याने विविध उपक्रम राबवित आहे आणि त्यांनी नक्षल चळवळीत गुंतलेल्या तरुणांना परावृत्त करुन त्यांना अहिंसेच्या मार्गावर आणण्यासाठीही मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या तरुणांनी गांधीविचारांवर आधारित परीक्षाही काही महिन्यांपूर्वी दिली.

आदर्श मित्र मंडळाची स्थापना सन २००० मध्ये करण्यात आली. उदय जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीपासून मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. पुणे शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीकडे अल्पवयीन मुले आणि तरुण मोठय़ा संख्यने वळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी मार्गावर वळणाऱ्या मुलांना परावृत्त करण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने उपक्रम सुरु केले. कारागृहात असलेल्या बंद्यांच्या पुनर्वसनासाठीही मंडळाने कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम हाती घेतले. बंद्यांच्या मुलांसाठी त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. तेवढय़ावर न थांबता जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दीड वर्षांपासून गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेले दीड वर्ष जगताप दरमहा न चुकता गडचिरोलीत जातात.

नक्षलग्रस्त भागात सुरु केलेल्या कामाची माहिती देताना ते म्हणाले की, नक्षलग्रस्त भागात काम करण्याची प्रेरणा मिळाल्यानंतर तेथील पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि उपअधीक्षक सागर कवडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्त्व तेथील जनतेला पटवून देण्यासाठी तेथे शाळा सुरु करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे नामकरण ‘ज्ञानगंगा’ असे करण्यात आले आहे. दुर्गम भागातील ३८ पोलीस ठाण्यांमध्ये ग्रंथालये सुरु करण्यात आली आहेत. तसेच अकरा हजार पुस्तके नक्षलग्रस्त भागात पाठविण्यात आली आहेत. भरारी प्रकल्पाअंतर्गत तेथील मुलांना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्यात आल्या आहेत.

मुलांना आकाशदर्शनासाठी दुर्बीण देण्यात आली आहे. ‘अग्निपंख’ उपक्रमाअंतर्गत नक्षलवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या कुटुंबातील मुलांसाठी रोजगार प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला आहे. नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या ५६ जणांनी नुक ताच हिसेंचा मार्ग सोडून दिला. त्यांची वाटचाल अहिंसेच्या मार्गावर सुरु आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

आम्ही वर्षभर  सक्रिय : उत्सव समाजाचा ; उपक्रम समाजासाठी त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळ

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीत महिलांचा मोठय़ा प्रमाणावरील सहभाग सुरू करण्याचे श्रेय त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळाला द्यावे लागेल. २३ वर्षांपूर्वी झालेल्या मंडळाच्या शताब्दी वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल न उधळण्याचा निर्णय घेत मंडळाने विधायक पाऊल उचलले. तांब्या-पितळ्याची भांडी घडविणाऱ्या त्वष्टा कासार समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सुरू केला. मात्र, हा उत्सव केवळ त्वष्टा कासार समाजापुरताच मर्यादित न राहता वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समस्त समाजाचाच झाला आहे. एक लाख पुस्तकांचा संग्रह असलेले मंडळाचे वाचन मंदिर हे आदर्श ग्रंथालय असून त्याला राज्य सरकारने ‘अ’ दर्जा दिला आहे.

लोकमान्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिल्यानंतर लगेचच त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मंडळाने यंदा १२३ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. चेन्नई (पूर्वीचे मद्रास) येथून ११२ वर्षांपूर्वी आलेल्या शिल्पकाराने शमीच्या लाकडापासून घडविलेली सुबक गणेशमूर्ती ही मंडळाची उत्सवमूर्ती आहे. १९९३ मध्ये मंडळाने शताब्दी वर्ष धडाक्यामध्ये साजरे केले होते. समाजातील कार्यकर्ते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काका वडके यांनी शताब्दी वर्षांपासून सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि विविध उपक्रम आजही त्याच उत्साहात राबविण्यात येतात. दरवर्षी नव्या कार्यकर्त्यांकडे मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि ताज्या दमाचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाशी जोडले जातात हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानुसार गेल्या वर्षी उपाध्यक्ष असलेले चंद्रशेखर साळवी यंदा मंडळाचे अध्यक्ष आहेत. आमोद वडके उपाध्यक्ष आणि किरण शेटे सचिव आहेत.

मंडळातर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची धान्यतुला करून हे धान्य वंचितांसाठी कार्यरत संस्थांना दिले जाते. स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ नागरिकांचा, तर प्रजासत्ताक दिनी ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा सत्कार केला जातो. रक्तदान शिबिर, कान-नाक-घसा तपासणी आणि महिलांची आरोग्य तपासणी असे सलग तीन दिवस आरोग्य शिबिर घेतले जाते. गेल्या वर्षी दुष्काळाची स्थिती असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून परिसरातील नळांची आणि जलवाहिन्यांची दुरुस्ती प्लंबरकडून करून घेत नागरिकांना पाणीबचतीचा मंत्र दिला.

परिसरातील दीडशे नळांची दुरुस्ती केली आणि ४० पाईप नव्याने बसविले. तांबट समाजातील युवा पिढीसह नागरिकांना हंडा, कळशी, बंब या साधनांची माहिती व्हावी या उद्देशातून समाजाच्या कालिकामाता मंदिरामध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले होते. मंडळातर्फे सरहद संस्थेमार्फत सीमेवरील जवानांसाठी राखी आणि नववर्षांची शुभेच्छापत्रे पाठविली जातात. गणेशोत्सवाच्या शाळेत नव्या पिढीतील कार्यकर्ते घडविण्याचे संस्कार केले जातात. हे कार्यकर्ते केवळ त्यांच्याच समाजाच्या नव्हे, तर समस्त समाजाच्या हिताचे उपक्रम राबवून मंडळाच्या लौकिकामध्ये भर घालण्याचे काम करतात.

इच्छापूर्ती राजतोरण प्रतिष्ठानतर्फे देखाव्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

पुणे : ‘जंगल वाचवा, प्राणी वाचवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा’ हा सामाजिक संदेश देणारा देखावा कात्रज येथील इच्छापूर्ती राजतोरण प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सादर केला आहे.

पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याविषयी मंडळाने तयार केलेली ध्वनिचित्रफीत प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. मंडळाचे संस्थापक अ‍ॅड. राजेंद्र धोंडे यांच्या संकल्पनेतून हा देखावा सादर केला आहे.

मंडळाने गेल्या वर्षी भोर तालुक्यातील कुडली, शिरोली, माझेरी, दुर्गाडी या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरवाटप आणि शाळांना मोफत वॉटर फिल्टरचे वाटप करून स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली.

शिवरे येथील डोंगरावर मंडळातर्फे एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्ष राजेंद्र डिंबळे, अ‍ॅड. विनायक कोळपे, डॉ. संजय यादव, शरद वाल्हेकर, विष्णू माने, आनंद घोडके, मनोहर बाठे, रवींद्र कोंडे, शिरीष चाचर, गणेश गावडे, सुभाष दगडे यांनी या उपक्रमांसाठी सहकार्य केले.