पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरण परिसरात मागील दोन दिवसांपासुन पाऊस होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता, गणेश उत्सव होईपर्यंत. शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसून, त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत आज महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्या बैठकीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहराला टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी आजच्या दिवशी ९७ टक्के आणि २८ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. मात्र यंदा शहर आणि धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवली असल्याने, सध्य स्थितीला धरण क्षेत्रात ३४ टक्के आणि ९ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली असून १५ ऑगस्टपर्यंत शहर, जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर महिना अखेर पर्यंत १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागा मार्फत माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे मागील दोन दिवसांपासुन धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि आगामी गणेश उत्सव लक्षात घेता. आजच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेतला गेला नाही. मात्र गणेशोत्सव दरम्यान त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन बैठक घेतली जाईल. त्यानंतर शहराच्या पाणी नियोजनाबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.