वाहने लावण्यासाठी जागेचा शोध; वाहनचालकही गोंधळात
लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : दुचाकीचे शहर असलेल्या पुण्यात वाहने लावण्यासाठी जागा मिळणे अवघड झाले आहे. दुचाकींबरोबर मोटारी खरेदी करण्याचे प्रमाण वाढते असून शहरातील गर्दीच्या भागात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगची मात्रा वापरली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत वाहतूक विभागाने नो पार्किंगचे आदेश जारी केल्याने वाहने लावण्यासाठी जागेचा शोध घेणाऱ्या चालकांची चांगलीच धावपळ उडत आहे.
शहरातील बहुतांश रस्त्यावर सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावण्याचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी शहरात नवीन वाहनांची भर पडत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने पुणेकरांकडून स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण वाढते आहे. शहरात नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी वास्तव्यास येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांपासून गल्ली-बोळात बेशिस्तपणे वाहने लावण्यात येत असल्याने नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आल्या. त्यामुळे शहरातील अनेक भागात गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंगचे प्रस्ताव गेल्या महिनाभरात मंजूर करण्यात आले आहेत.
एकीकडे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नो पार्किंग करण्यात येत असून शहरातील वाहनांची संख्या विचारात घेता वाहने लावायची कोठे, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या महिनाभरात हडपसर, डेक्कन, रास्ता पेठेतील अपोलो टॉकीजसमोरील खाऊ गल्ली तसेच सारसबागेसमोरील चौपाटी अशा परिसरात नो पार्किंगचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
नो पार्किंग करण्यात आलेली महत्त्वाची ठिकाणे
डेक्कन जिमखाना गुडलक हॉटेलशेजारील गल्ली
फग्र्युसन रस्त्यालगतचा घाटपांडे पथ
सारसबाग चौपाटी परिसर
अपोलो चित्रपटगृहासमोरील खाऊ गल्ली
वाहनचालकांकडून सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या भागात नो पार्किंगचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. संबंधित ठिकाणी नो पार्किंगचे फलक तसेच पट्टे आखून घेण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. वाहने लावण्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी पार्किंग धोरण ठरविण्याबाबत वेळोवेळी महापालिकेबरोबर चर्चा करण्यात येत आहे.
– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग