‘कुपोषणाचा प्रश्न समोर आल्यानंतर मेळघाट भागात वैद्यकीय सेवा पोहोचल्या, पण तीस वर्षांनंतरही तिथे शल्यचिकित्सक (सर्जन) आला नाही. आता त्या ठिकाणी शस्त्रक्रियागृह उभे राहिले आहे. या शस्त्रक्रियागृहातील उपकरणे आणि शल्यचिकित्सेची कौशल्ये या गोष्टी पुढे नेण्यासाठी आता मित्रांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत,’ असे प्रतिपादन मेळघाट परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केले.
डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याने मेळघाटमध्ये केलेल्या वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल ‘सर फाऊंडेशन’  व ‘डीपर’ या संस्थांतर्फे त्यांना रविवारी ‘महापालक सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालक दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भा. ल. ठाणगे व रामभाऊ इंगोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डीपर संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. बी. गायकवाड, सर फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले, उपाध्यक्ष डॉ. रोहिणी बुटले आदि या वेळी उपस्थित होते.
कोल्हे दाम्पत्याने त्यांच्या मेळघाटमधील कार्याविषयीचे अनुभव सांगितले. डॉ. रवींद्र म्हणाले, ‘तिथे जगण्याची हिंमत आणि माझ्या विचारांना साजेशी पत्नी मला माझ्या मित्रांमुळेच मिळाली. स्मिताने मला सतत साथ दिल्यामुळे आमच्या मुलांची घडण झाली. तिने मला सामाजिक जाणीव दिली आणि माझ्या वैद्यकीय जीवनाला त्यामुळे अनेक आयाम जोडले गेले. काम करताना संकटे आली, पण त्यापेक्षा अधिक हात मदत देण्यासाठी पुढे झाले.’