पुणे तिथे काय उणे ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात अनेक नवनवीन प्रयोग पाहायला मिळतात. खाण्याचा पदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाणीपुराचा गणपती होऊ शकतो अशी तुम्ही कधी कल्पना तरी केली होती का? ऐकून काहीसे आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. पुण्यातील पाणीपुरीचा मोठा व्यवसाय असणाऱ्या गणेश पाणीपुरीच्या विक्रेत्याने एक अनोखी कल्पना लढवली आहे. चमचमीत अशा पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पुऱ्यांचा वापर करुन त्याने गणपती तयार केला आहे.

पुण्यात गणेश भेळची अनेक दुकाने आहेत. याठिकाणी भेळ आणि पाणीपुरी खाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. एरंडवणे येथे हा पुऱ्यांचा बाप्पा साकारण्यात आला आहे. या दुकानाचे मालक रुपेश गुडमेवार हे गणरायाचे भक्त असून त्यांनी स्वत: हा बाप्पा साकारला आहे. तब्बल १० हजार पुऱ्या, अमेरीकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन ही १० फूटी बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या बाप्पाचे दर्शन घेण्याकरीता पाणीपुरीचे चाहते आणि गणरायाचे भक्त एकच गर्दी करत आहेत.

याविषयी सांगताना, रुपेश म्हणाले, एरंडवण्यात मागील वीस वर्षांपासून आमचे भेळीचे दुकान आहे. गणेश उत्सवामध्ये गणरायासाठी काही तरी सजावट करावी असे प्रत्येक वर्षी वाटायचे २०१२ मध्ये पहिल्यांदा ३५०० पुऱ्याची गणरायाची मूर्ती साकारण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी मोठी मूर्ती साकारण्याचे ठरवले त्यानुसार साधारण १५ दिवसांत गणरायाची मूर्ती साकारली. यासाठी जवळपास २ लाख रुपये खर्च आला आहे. प्रत्यक्ष मूर्ती साकारल्यानंतर एक वेगळाचा आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.