सात वर्षांत मृत्यूच्या संख्येत दुपटीने वाढ

रेल्वे स्थानकात पादचारी पुलाची सुविधा असतानाही केवळ वेळ वाचविण्यासाठी धोकादायकपणे थेट लोहमार्ग ओलांडणारे प्रवासी आणि लोहमार्गालगत वाढत्या वस्त्यांमुळे लोहमार्गावर अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे विभागात एका वर्षांत अशा प्रकारे ५४० जणांना प्राण गमवावा लागला. मागील सात वर्षांत मृत्यूची ही संख्या दुप्पट झाल्याचे वास्तव आहे. पुणे विभागात विशेषत: पुणे-लोणावळा या पट्टय़ामध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत.

लोहमार्ग ओलांडताना पादचारी पुलाचाच वापर करावा, अशी सूचनाही वेळोवेळी स्थानकावर देण्यात येतात. असे असतानाही अनेक जण शॉटकर्ट घेताना जीव धोक्यात घालतात. लोहमार्गालगत असणाऱ्या वस्त्यांत रेल्वेकडून  जनजागृती अभियान राबविण्यात येते. लोहमार्ग न ओलांडण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात येतात. अनेकदा हॉर्न वाजविण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहेत.

आत्महत्याही डोकेदुखी ठरताहेत

वेगवेगळ्या कारणांवरून होणाऱ्या आत्महत्यांच्या विषयावर सातत्याने चर्चा होत असतानाच लोहमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही अलीकडे वाढली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात प्रत्येक महिन्याला सरासरी १५ नागरिकांकडून लोहमार्गावर आत्महत्या केली जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. पुणे ते लोणावळा या मार्गावरील ठरावीक ठिकाणी पिंपरी, चिंचवड व आकुर्डी स्थानकालगतच्या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात आत्महत्या होतात. मावळमध्ये वडगाव व कामशेत या परिसरातही रेल्वेखाली आत्महत्येच्या घटना सातत्याने घडतात. यामुळेही रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे.

मोबाइल हेडफोन घातक!

अनधिकृतपणे लोहमार्गावरून चालताना किंवा लोहमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातात प्रामुख्याने मोबाइलचा हेडफोन घातक ठरत आहे. मोबाइलच्या हेडफोनद्वारे गाणी ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हेडफोन लावून लोहमार्ग ओलांडणे किंवा लोहमार्गावरून जाणे अत्यंत घातक असतानाही काही जणांकडून असे प्रकार केले जातात. हेडफोनमुळे लोहमार्गावरून येणाऱ्या गाडीचा हॉर्नही ऐकू येत नाही. त्यामुळेही अपघात होण्याची संख्याही सध्या वाढली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.