पुणे : शिक्षणासाठी पदवी लागते. कलेला पदवी लागत नाही. पदवीविनाही कला आत्मसात करता येते याचे मी उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी मंगळवारी केले. राजकीय व्यंगचित्रकला शिकण्यासाठी जे. जे. आर्ट स्कूलमधून तीन वर्षांतच बाहेर पडल्यामुळे माझ्याकडे कोणतीही पदवी नाही आणि आजपर्यंत मला कोणीही पदवीबद्दल विचारलेही नाही, असेही त्यांनी सांगितले.

झील इन्स्टिटय़ूट पुणे आणि कार्टुनिस्ट कंबाइन यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इंक अलाइव्ह’ व्यंगचित्र कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ठाकरे बोलत होते. कार्टुनिस्ट कम्बाइनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, प्रशांत कुलकर्णी, चारुहास पंडित, घनश्याम देशमुख, झील इन्स्टिटय़ूटचे संस्थापक एस. एम. काटकर, सचिव जयेश काटकर आणि कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे या वेळी उपस्थित होते.

राज्य सरकार जेव्हा चित्रकला हा विषय पर्यायी विषय म्हणून ठेवते, तेव्हा कलेची अवस्था काय असते हे मी सांगायला नको. मात्र, विद्यार्थ्यांमधील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा संस्था उभ्या राहायला हव्यात, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणतीही एक कला असू शकते. ती कला जोपासली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

‘तुम्ही सारे भाग्यवान’

फडणीस सरांना चित्र काढताना पाहणारे तुम्ही सारे भाग्यवान आहात. फडणीस सरांची चित्रे मी पाहिली आहेत. पण, त्यांना चित्र काढताना प्रथमच पाहतो आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. या वयातही रेषा मारताना त्यांचा हात स्थिर असतो, असेही ते म्हणाले.