कॅनव्हॉसचे हूड असलेल्या कोणत्याही वाहनांना शालेय विद्यार्थी वाहतुकीची परवानगी नाही.. असा एकच उल्लेख शासनाच्या शालेय बसबाबतच्या नियमावलीत आल्याने रिक्षांमधून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर बंदी येण्याची शक्यता होती. मात्र, काही ठिकाणी विद्यार्थी वाहतुकीसाठी रिक्षाला पर्याय नसल्याने, तसेच रिक्षा संघटनांकडून आलेल्या मागणीचा विचार करून सुधारित नियमावलीत रिक्षाला विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली. पण, त्यासाठी रिक्षा ‘भक्कम’ करावी, असा उल्लेख टाकण्यात आला. भक्कम म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रिक्षाची योग्य रचना व टणक हूड.. पण, त्यानुसार अद्यापही शालेय विद्यार्थी वाहतुकीतील रिक्षा ‘भक्कम’ झालेली नाही.
शालेय विद्यार्थी वाहतुकीत असलेल्या बसगाडय़ांना झालेले अपघात लक्षात घेऊन राज्य शासनाने शालेय बसबाबत नवी नियमावली तयार केली. २०१२ पासून या नियमावलीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नियमावलीत शालेय विद्यार्थी वाहतुकीतील बसबाबत अत्यंत काटेकोर नियम आहेत. नियमावली तयार करताना रिक्षा हे विद्यार्थी वाहतुकीसाठी योग्य वाहन नसल्याचे गृहीत धरून रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीतून वगळण्यात आले होते. मूळ स्कूल बस नियमावलीमध्ये काही बदल करावेत, अशी मागणी स्कूल बस चालक-मालकांच्या संघटनांनी केली होती. त्यानुसार स्कूल बस नियमावलीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता काही तांत्रिक बदल करण्यात आले. हा नवा मसुदा तयार करताना शासनाने रिक्षाचाही शालेय विद्यार्थी वाहतुकीत मुभा देण्याचा निर्णय घेतला.
नियमानुसार रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीत मुभा देत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रिक्षात काही बदल करण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार रिक्षाचे सध्याचे हूड अधिक टणक, मजबूत करावे. मागील आसनांजवळील रिक्षाची एक बाजू ग्रिलने पूर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूला ग्रिलचा दरवाजा करावा. त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रणेचाही रिक्षात समावेश असावा, असे ढोबळ बदलांचे बंधन आहे. मात्र, शालेय वाहतुकीतील रिक्षा आजही पूर्वीच्या रूपातच धावत आहेत. शालेय वाहतुकीतील रिक्षाला आजवर कोणता गंभीर अपघात झालेला नाही, हे वास्तव असले, तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही रिक्षा ‘भक्कम’ होणार तरी कधी, हा प्रश्व विचारला जात आहे.

पुण्यात शालेय वाहतुकीसाठी रिक्षाची गरज
पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पंधरा हजाराहून अधिक रिक्षा शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत आहेत. मोठय़ा किंवा मिनी बसने बहुतांश विद्यार्थ्यांची वाहतूक होत असली, तरी काही भागापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षाला पर्याय नाही. अरुंद व गल्लीबोळातील रस्त्यावर खासगी बससारख्या मोठय़ा वाहनांना एकतर बंदी आहे किंवा बस आतमध्ये घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी रिक्षा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळेच पुण्यासारख्या शहरामध्ये शालेय वाहतुकीत रिक्षाचे महत्त्व कायम आहे.