बाराशेजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी तेथे घडलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा, होमगार्ड, घातपात विरोधी पथक यासह व्हीडीओ आणि छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, सामाजिक वातावरण बिघडू नये, यासाठी तब्बल बाराशेजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील या वेळी उपस्थित होते. ‘यंदा अधिक भर गर्दीच्या नियोजनावर दिला जाणार आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. काही मानवनिर्मित आपत्ती न येण्यासाठी राज्यभर कारवाई करण्यात आली आहे. दहा लाख नागरिक येण्याची शक्यता गृहित धरून नियोजन करण्यात आले असून परिस्थिती पाहून कोरेगाव भीमा किंवा संबंधित भागातील इंटरनेट सेवा बंद करायची किंवा कसे, याबाबत निर्णय घेतला जाईल. समाजमाध्यमांतून समाजात फूट पाडणारे संदेश प्रसारित केल्याबद्दल ४५ जणांवर  कारवाई करण्यात आली आहे. १ जानेवारीला कार्यक्रमाच्या ठिकाणी दारूबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कोरेगाव भीमा येथे सभा घेण्यासाठी संस्था-संघटनांचे पाच अर्ज आले होते. त्यांना सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती संदीप पाटील यांनी यावेळी दिली.

पोलीस बंदोबस्त

पाच हजार पोलीस कर्मचारी, बारा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा, घातपातविरोधी सात पथके, बाराशे होमगार्ड, दोन हजार स्वयंसेवक, आठ सहायक पोलीस अधीक्षक, ३१ जिल्हा पोलीस उपअधीक्षक, १२६ पोलीस निरीक्षक, ३६० सहायक पोलीस निरीक्षक असा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. याबरोबरच ४० व्हीडीओ कॅमेरे, ३०६ सीसीटीव्ही, १२ ड्रोन, ५० दुर्बिणी, पोलिसांच्या हेल्मेटमधील आणि छुपे ५० कॅमेरे याद्वारे बारीक नजर असेल. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील बंदोबस्ताचे प्रमुख असतील, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.

वाहतूक बदल

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री अकरापासून वाहतूक वळवण्यात येणार आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळवली जातील. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरून हडपसरकडे वळवली जातील. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बाह्य़वळण येथून नगरकडे वळवली जातील.

नागरिकांसाठी सोयी-सुविधा

कार्यक्रमासाठी २५ रुग्णवाहिका, पाच कार्डियाक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक, परिसरातील रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव, वीस कि. मी. लांबीचे कठडे, पाण्याचे दोनशे  टँकर, २७० आगरोधक बलून, तीनशे हलती स्वच्छतागृहे, अग्निशमन दलाचे तेवीस बंब, सोळा क्रेन, चौदा ठिकाणी वीजव्यवस्था, पीएमपीच्या दीडशे गाडय़ा, दोनशे खासगी वाहने, पस्तीस नागरिक मदत केंद्रे, भीमा कोरेगाव व पेरणे परिसरात अकरा ठिकाणी ५० हजार वाहनांसाठी वाहनतळ अशा सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधता यावा यासाठी विशेष पुस्तिका तयार करण्यात आली असून कार्यक्रमाच्या दिवशी या पुस्तिकेचे वाटप नागरिकांना करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.