पैसे काढण्यासाठी मित्राबरोबर एटीएम केंद्रात शिरल्यावर ‘एका वेळी फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश घेता येईल’ अशी सूचना केंद्रात लावलेल्या कॅमेऱ्यातून ऐकू आली तर चकित होऊ नका. या सूचनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलेत तर एटीएम केंद्र धोक्यात असल्याचे दर्शवणारी घंटाही वाजेल.
कॅमेरे आणि आवाजी यंत्रणा वापरून एटीएम केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठीचे मॉडेल ‘झायकॉम इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टिम्स’ या कंपनीने विकसित केले असून ‘सास’ (सिक्युरिटी अॅझ अ सव्र्हिस) या नावाने ते बाजारात आणले आहे. एटीएम केंद्रांमध्ये पैसे काढायला आलेल्या ग्राहकांवर पैशांच्या चोरीसाठी ठिकठिकाणी झालेल्या हल्ल्यांवर हे मॉडेल चांगला उपाय ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.
या मॉडेलमध्ये एटीएम केंद्रातील एटीएम मशिन, चेक बॉक्स, वातानुकूलित यंत्रणा किंवा केराची टोपली यांपैकी काहीही चोरण्याचा प्रयत्न झाल्यास मुंबईतील गोरेगावमध्ये असलेल्या कंपनीच्या प्रमुख केंद्रावर धोक्याची घंटा वाजेल आणि केंद्रीय यंत्रणेद्वारे संदेश मिळताच त्वरित सेवा देणारी पथके त्या त्या घटनास्थळी पोहोचतील, असे कंपनीचे संचालक प्रमोद राव यांनी सांगितले. काही बँकांनी आपल्या एटीएम केंद्रांसाठी ही सेवा घेतली असून पुण्यासह देशात एकूण ६ हजार एटीएम केंद्रांत हे मॉडेल बसवले जाईल.