* पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा आदेश
* तरुणीची तक्रार घेण्यास दिरंगाई करणारे तीन पोलीस निलंबित
महिलांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे. त्यांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे, असा आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बुधवारी दिला. दरम्यान कोंढव्यात जाहिरात क्षेत्रातील तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
कोंढव्यात जाहिरात क्षेत्रातील एका तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान तरुणीची तक्रार घेण्यास टाळाटाळ के ली तसेच या घटनेची नोंद अदखलपात्र म्हणून करण्यात आली. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भिकोबा देवकाते, हवालदार नानासाहेब भारुड, महादेव सुर्वे यांना निलंबित करण्यात आले.
शिवाजीनगर मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त शुक्ला म्हणाल्या की, महिलांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे. छेडछेडीची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते. महिलांच्या तक्रारी प्राधान्याने नोंदवून घ्याव्यात तसेच छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.