पुण्याचं नाव जिजापूर करण्याबाबतच्या आपल्याच कथीत सूचनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे. मी असं म्हटलोच नव्हतो तर संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावं अशी मागणी केली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादनंतर आता उस्मानाबादचे देखील नामांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत आंबेडकर यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी असं म्हणालोच नव्हतो. तर संभाजी महाराजांची दफनभूमी पुण्यात असल्याने पुणे जिल्ह्याला जर कोणाचे नाव द्यायचे झाल्यास त्यांचे नाव योग्य राहील, असं मी म्हणालो होतो”
हे सरकार टिकेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, भांडणं झाली की काय होतं हे आपणा सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे जी घरातील निती तीच राजकारणातील नीती, त्यामुळे नवीन काहीच नाही, असे सूचक विधान महाविकास आघाडी सरकार बद्दल त्यांनी केले.
आणखी वाचा- “हीच योग्य वेळ आहे”; धनंजय मुंडे प्रकरणी प्रकाश आंबेडकरांच सूचक भाष्य
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करणं हा शिवसेनेचा फार पूर्वीपासूनचा अजेंडा आहे. तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. शहरांच्या नामांतराच्या भूमिकेला काँग्रेसचा विरोध आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर वारंवार औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर तर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. त्यामुळे नामांतराच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 4:35 pm