गणेशोत्सवात पुणे शहरात देखावे पाहण्यासाठी नागरिक शेवटच्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्याअनुषंगाने मध्य शहरातील आणि पेठ भागांमधील मुख्य रस्ते संध्याकाळनंतर या काळात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या काळात वाहतुकीमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

पोलीस उपायुक्तांच्या आदेशांनुसार, पुणे शहर, उपनगरातील आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक गणेश देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्य भागात विशेषतः पेठ भागांमध्ये गर्दी करतात. त्यामुळे ६ ते ११ सप्टेंबर या काळात शहराच्या मध्य भागातील रस्ते संध्याकाळी ५ वाजल्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, हे वाहतुकीचे निर्बंध अत्यावश्यक सेवा आणि पोलिसांच्या वाहनांना लागू असणार नाहीत.

या काळात लक्ष्मी रस्ता हामजे खान चौक ते टिळक चौकापर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक डुल्या मारुती चौक, खडीचे मैदान आणि महाराणा प्रताप मार्ग आणि घोरपडे पेठ या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच शिवाजी रस्ता गाडगीळ पुतळ्यापासून स्वारगेटच्या जेधे चौकापर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे शिवाजीनगरवरुन येणाऱ्या प्रवाशांनी स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रस्ता-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोड या मार्गाने जाता येईल. तसेच कुंभार वेस चौकातून वाहतूक वळवून पवळे चौकातून सात तोटी चौक आणि देवजी बाबा चौक या मार्गावर वळवण्यात येणार आहे. दरम्यान, बाजीराव रस्ता पुरम चौकापासून अप्पाबळवंत चौक या पटट्यात बंद असणार आहे. या मार्गावरील वाहतूक केळकर रस्त्यावरुन वळवण्यात येणार आहे. तसेच टिळक रोडवरील वाहतूक चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी MCCIA इमारतीपासून हिराबाग चौकापर्यंत बंद राहणार आहे. मात्र, पीएमपी बस आणि रिक्षांसाठीच हा मार्ग सुरु असेल.

त्याचबरोबर सिंहगड गॅरेज ते हिराबाग चौक, जवळकर रोड ते हिराबाग चौक, अनंत नाईक रोड ते टिळक रोड, सणस रोड ते गोविंद हालवाई चौक, गंज पेठ ते वस्ताद तालीम आणि कोहिनूर चौक ते बाबाजान चौक या मार्गावरील वाहतूक गरजेनुसार बंद ठेवण्यात येईल किंवा इतर मार्गांवर वळवण्यात येईल, असेही वाहतुक पोलीस उपायुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

‘नो पार्किंग’ झोन –

मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रोड ते फुटका बुरुज चौक आणि आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या ठिकाणांना तात्पुरते नो पार्किंग झोन बनवण्यात येईल.

पार्किंगसाठी उपलब्ध ठिकाणं –

विमलाबाई गरवारे कॉलेज, एच. व्ही. देसाई कॉलेज, पुलाची वाडी, पुरम चौक ते हॉटेल विश्व, दारुवाला पूल ते खडीचे मैदान, सर्कस ग्राऊंड, व्होल्गा चौक ते मित्रमंडळ चौक, काँग्रेस भवन आणि हमालवाडा या जागा अतिरिक्त पार्किंगसाठी उपलब्ध असतील.