पुणे : विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, घटस्फोटित, नवरा सोडलेली, नवऱ्याने टाकलेली, बिना लग्नाची असे शब्द वापरून आपण एकल महिलांचा अपमान करतो. अशा शब्दांचा त्या व्यक्तीवर सखोल परिणाम होत असतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेच्या वतीने या महिलांच्या सन्मानासाठी ‘अभया’ अभियान हाती घेतले आहे. वंचित संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेच्या संचालिका सुनीता जोगळेकर आणि मीनाक्षी नवले या वेळी उपस्थित होत्या.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, एकल महिलांचा उल्लेख करताना बोलताना अनेकदा असे शब्द सहज वापरतो. मात्र, तिच्या मनावर होणाऱ्या आघातांचा आपण विचार करत नाही. संघर्षमय परिस्थितीचा सामना करत निर्भयपणे उभी राहणारी स्त्री म्हणजे अभया असते. तेव्हा संघर्ष वाट्याला आलेल्या अशा स्त्रियांना आपण अभया म्हणायला हवे. “या अभियानांतर्गत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा सर्वांना निवेदने देण्यात येणार आहेत. या स्त्रियांसाठी अभया शब्दाचा वापर करण्याचा आग्रह केला जाणार आहे, असेही  कुर्लेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : चंद्रकात पाटील म्हणतात गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला….

अपंगांसाठी दिव्यांग, मतिमंद यासह प्राण्यांच्या बाबतीत श्वान, वराह असे सन्मानजनक शब्द आपण वापरतो आहोत. मग स्त्रियांच्या बाबतीत भाषिक संवेदनशीलता दाखवायला हवी की नको, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच विचार घेऊन आम्ही समाजातील या महिलांच्या सन्मानासाठी हे अभियान राबवत आहोत. – मीना कुर्लेकर, कार्यवाह, वंचित विकास संस्था

हेही वाचा : रस्ते काँक्रिटीकरण वृक्षांच्या मुळावर; झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अभया’साठी संवाद सुविधा

खूपदा अशा महिलांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. मात्र, कोणाशी बोलावे हे समजत नाही. यासाठी संस्थेच्या वतीने ‘अभया-मनातली’ ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना हा मुक्तसंवाद करायचा असेल त्यांनी ९३७०८२५३६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा पूर्णपणे मोफत आणि गोपनीय आहे, असे सुनीता जोगळेकर यांनी सांगितले.