पुणे: ऑनलाइन गेमिंगविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी रम्मी, तीन पत्ती हे खेळ खेळण्यात आले. असा प्रकार यापूर्वी कधीच न पाहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि कामानिमित्त आलेले नागरिक या सर्वांचेच लक्ष वेधले. मात्र, हे कृत्य करण्यामागची भूमिका समजल्यानंतर सर्वांनीच हे खेळ खेळणाऱ्यांचे कौतुक करत याबाबत सरकारने नियमावली करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

लोकसंघर्ष पक्षातर्फे गेले काही महिने सातत्याने राज्य सरकारकडे ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली गेली आहे. मात्र, यावर राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची कृती केलेली नाही. शासनाला जागे करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात आले. ऑनलाइन गेमिंगमुळे आबालवृद्धांना वेड लावले आहे. याबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने नियमावली केलेली नाही. त्यामुळे लोकसंघर्ष पक्षाकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा… पिंपरी : महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन गेमिंगमुळे लोकांना त्याचे व्यसन लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष ॲड. योगेश माकणे, संघटक ॲड. शिवम पोतदार, ॲड. अभिजित कुलकर्णी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रम्मी, तीन पत्ती हे खेळ पैसे लावून खेळण्यात आले. जर ऑनलाइन गेमिंगचा जुगार चालू शकतो, तर मग पारंपरिक पद्धतीने पैसे लावून खेळाला जाणारा जुगार कायद्याला का चालत नाही?, असा सवाल पक्षाच्या वतीने विचारण्यात आला. राज्य सरकारने पुढील दोन महिन्यात ऑनलाइन गेमिंगबाबत कठोर कायदे केले नाही, तर पक्षाच्या वतीने मंत्रालयासमोर ‘पत्ते खेळा’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे ॲड. माकणे यांनी सांगितले.