‘एआयसीटीई’कडून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सुरू असलेल्या अभ्यासक्रमांचे वर्ग १ सप्टेंबरपासून, तर पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.

‘एआयसीटीई’ने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रम, एकल संस्थांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, दूरशिक्षण अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रियेसाठी ३० जूनची मुदत देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीचे प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होतील. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाला घेतलेला प्रवेश १० सप्टेंबपर्यंत रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळेल. पहिल्या वर्षांच्या शिल्लक जागांवर १५ सप्टेंबपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. पीजीडीएम (व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका) आणि पीजीसीएम (कॉस्ट मॅनेजमेंट पदव्युत्तर पदविका) अभ्यासक्रमांच्या नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू होतील. घेतलेला प्रवेश ६ ऑगस्टपर्यंत रद्द केल्यास पूर्ण शुल्क मिळेल. प्रवेशाची अंतिम मुदत ११ ऑगस्ट आहे. तर दूरशिक्षणाद्वारे होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या प्रवेशासाठी १ सप्टेंबर आणि दुसऱ्या सत्राच्या प्रवेशासाठी १ फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aicte announces revised academic schedule ssh

ताज्या बातम्या