पुणे : महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना भाजप पदाधिकाऱ्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून, वसतिगृह, तसेच अद्ययावत रुग्णालयाचे काम सुरू होऊन पूर्ण होण्यास चार वर्षांचा अवधी लागणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेत भाजपची सत्ता असताना विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रकल्प उभारण्यामध्ये पुढाकार घेतला होता. यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या जागेवर या वैद्यकीय महविद्यालयाचे काम सुरू आहे. सध्या मुख्य इमारतीचे काम सुरू असून वसतिगृहाचे कामही सुरू केले जाणार आहे. याच परिसरात अद्ययावत रुग्णालय उभारले जाणार आहे.
महापालिकेत सत्ता असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले होते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सध्या या वैद्यकीय महाविद्यालयाचे काम महापलिकेच्या सणस शाळेमधून सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वतंत्र रुग्णालय, सेवा विभाग सुरू न केल्यामुळे नॅशनल मेडिकल कौन्सिलने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविली होती. या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात प्रात्यक्षिकाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
महापालिका प्रशासनाने वसतिगृहाच्या कामाची निविदा काढली आहे. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात वसतिगृहाचे काम पूर्ण होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे या वसतिगृहाच्या कामासाठी पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात ५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यांपैकी १० कोटींचे वर्गीकरण प्रशासनाने औषधांची खरेदी, तसेच इतर कामांसाठी केले आहे. मात्र, या वर्गीकरणाचा कोणताही परिणाम कामावर होणार नाही, असे भवन रचना विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा…पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरची मोटारीला धडक; एकाच कुटुंबातील चौघे जखमी, अपघातानंतर वाहतूक विस्कळीत
महापालिकेच्या नायडू रुग्णालयाच्या जागेमध्ये अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय हा प्रकल्प उभारला जात आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी येथे वसतिगृह बांधले जाणार आहे. तसेच, अद्ययावत रुग्णालय उभारले जाणार आहे. यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे. युवराज देशमुख, भवन विभागप्रमुख