लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात जमले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

आणखी वाचा-लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.