लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील काच कारखान्यात रविवारी दुपारी अवजड काचा उतरविताना झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला, तसेच दोघे जण गंभीर जखमी झाले. दुर्घटनेस जबाबादार असल्याचप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कारखााना मालकासह पाचजणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी इंडिया ग्लास सोल्यूशन्सचे मालक हुसेन तय्यबरअली पिठावाला (वय ३८, रा. थ्री ज्वेलर्स सोसायटी, टिळेकरनगर कोंढवा). हातीम हुसेन मोटारवाला (वय ३६, रा. येवलेवाडी, कोंढवा), गाडी मालक संजय धुळा हिरवे (वय ३४, रा. कळंबोली, नवी मुंबई), ठेकेदार सुरेश उर्फ बबन दादू चव्हाण, गाडी चालक राजू दशरथ रासगे (वय ३०, कळंबोली, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत दयानंद ज्ञानदेव रोकडे (वय ३६, रा. शिवसृष्टी, दांडेकर वस्ती, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! सायबर चोरट्यांनी केली एवढ्या कोटींची फसवणूक, कुठे घडला प्रकार?

अमित शिवशंकर कुमार (वय २७ वर्ष), विकास सरजू प्रसाद गौतम (वय २३), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ , सध्या रा. धांडेकरनगर, येवलेवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दुर्घटनेत जगतपाल संतराम सरोज (वय ४९), मोनेश्वर कुली (वय ३४), पिंटू नवनाथ इरकल (वय ३०), तसेच फिर्यादी दयानंद रोकडे जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येवलेवाडी रस्त्यावर सीएनजी पंपामागे इंडिया ग्लास सोल्युशन काच तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. तेथून शहरातील गृहप्रकल्पांना आणि व्यावसायिक कार्यालयांसाठी विविध प्रकारच्या काचा पुरवल्या जातात. या कारखान्यात काचांचे मोठे तुकडे कापून, तसेच काचांना पॉलिश केले जाते. कच्चा माल असणाऱ्या काचांच्या तुकड्यांचा ट्रक ठेकेदाराने रविवारी दुपारी कारखान्यात आणला. तेथील मजूर या जड वजनाच्या काचा उतरवत होते. काचेचे जड तुकडे खाली उतरवत असताना त्यांना बांधण्यात आलेला पट्टा तुटला आणि दोन टन वजनाचे काचेचे तुकडे मजुरांच्या अंगावर पडले. अंगात काचा शिरल्याने चार कामगार जागीच मृत्यमुखी पडले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.