पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या गैरवर्तणुकीबाबतचा अहवाल खेडकर यांच्या खुलाश्यासह केंद्राने राज्य सरकारकडे मागविला आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला पाठविलेला अहवाल हा मराठी भाषेत होता. त्यामुळे केंद्राकडे तो पाठविताना इंग्रजीत पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पूजा खेडकरने ‘वायसीएम’ रुग्णालयातून अंपगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघड

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर पूजा खेडकर यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य शासनाला सविस्तर अहवाल पाठविला. या अहवालात जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेले संदेश, अपर जिल्हाधिकारी यांचा अहवाल, सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांचा अहवाल, अपर जिल्हाधिकारी यांचे खासगी दालन ताब्यात घेऊन तेथे स्वत:चे पदनाम, नावासह पाटी लावून नवे कार्यालय सुरू करणे याची छायाचित्रे सादर करण्यात आली. हा अहवाल शासनाला पाठविल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय कारण देत खेडकर यांची उर्वरित प्रशिक्षणासाठी वाशिम जिल्ह्यात पदस्थापना केली.

हेही वाचा >>> Manorama Khedkar : पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर नॉट रिचेबल! पोलीस म्हणाले, “आम्ही त्यांच्या घरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी कार्यालयातील खेडकर यांच्या गैरवर्तणुकीचा बभ्रा झाल्यानंतर खेडकर यांनी नियुक्तीच्या वेळेस सादर केलेल्या कागदपत्रांवरून देखील वाद निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणांची केंद्र सरकारने दखल घेऊन एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून दोन आठवड्यांत अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने आता राज्य शासनाकडे खेडकर यांच्या प्रशिक्षण कालावधीतील वर्तणुकीबाबतचा तपशिलवार अहवाल राज्य शासनाकडे मागितला आहे. तसेच त्यावर खेडकर यांचा खुलासा घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला असून, तो इंग्रजी भाषेत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून हा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.