मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. या राजकीय सत्तासंघर्षामुळे एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात संबंधात वितुष्ट आलं. पण, या सगळ्याला छेद देणारं चित्र गुरूवारी ( २३ मार्च ) विधानभवनात पाहायला मिळालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसून आले. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येतील का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पुण्यात करण्यात आला. तेव्हा पाटील यांनी सांगितलं, “परत येण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. बारीक झरोका कुठे दिसत नाही. बंद खोली किंवा उघड्या बागेतसुद्धा चर्चा नाही.”
हेही वाचा : रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर, तर राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला; नेमकं काय म्हणाले?
“पण, सभागृहात कितीही भांडलो, तर बाहेर येऊन चहा पिण्याची आपली संस्कृती आहे. शेवटी आपण मुद्द्यांवर भांडतो, व्यक्तीगत दुश्मनी असण्याचं कारण नाही. त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याचं कारण नाही. आता अशी काही शक्यता दिसत नाही. मात्र, राजकारणात कोणत्याही पहाटे काहीही होऊ शकतं,” असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा : “मालेगावच्या सभेत जास्तच खोटं बोलले, तर…”, दादा भुसेंचा ठाकरे गटाला इशारा
मालेगावात उद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दूमध्ये फलक लागल्यामुळे टीका होत आहे. त्यावर पाटीलांनी म्हटलं, “मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागले, म्हणजे काय लगेच हिंदुत्व सोडले असे होत नाही. मुस्लीम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल. म्हणून मालेगावमध्ये फलक लागले असतील.”