पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता महिला आणि पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांची कमरता असताना मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेली स्वयंचलित ई-टाॅयलेट बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. शहरातील १५ पैकी जेमतेम तीन ई-टाॅयलेट सुरू आहेत. मात्र, सुरू असलेल्या स्वच्छतागृहांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या विरोधात नागरिकांकडून निषेधाचे फलकही लावण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेत गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी खासदार विकासनिधीतून भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टाॅयलेटच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार शहरात १५ ठिकाणी ई-टाॅयलेट उभारण्यात आली. मात्र सध्या त्यांपैकी केवळ तीन टाॅयलेट सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा… पुणे : मंडप, विसर्जन रथ रस्त्यांवरच; मंडळांवर कारवाई सुरू

या अत्याधुनिक ई-टाॅयलेटचे व्यवस्थापन आणि देखभाल-दुरुस्तीचे काम खासगी कंपनीला देण्यात आले होते. करोना संसर्ग कालावधीत या कंपनीबरोबरचा करार संपला आणि त्यानंतर ई-टाॅयलेट बंद पडली. ई-टाॅयलेट सेवेसाठी शुल्क आकारले जात असले, तरी टापटीप, सुरक्षितता, अत्याधुनिक सुविधा आदी कारणांमुळे या स्वच्छतागृहांचा वापर वाढला होता. खासगी कंपनीबरोबरचा करार संपुष्टात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून करार सुरू करण्यासंदर्भात विलंब करण्यात आला. सध्या ही प्रक्रिया करण्यात आली असली, तरी केवळ तीन स्वच्छतागृहे सुरू आहेत. अन्य स्वच्छतागृहे बंद असल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या अत्याधुनिक ई-टाॅयलेटची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत. त्यामुळे त्यांचा वापरही होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, मोटारीच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

या ठिकाणी सुविधा

जंगलीमहाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, माॅडेल काॅलनी, हिरवाई गार्डन, भैरोबानाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर येथील मावळे आळी, विमाननगर, राजाराम पूल, नीलायम चित्रपटगृह, वाडिया महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता येथे ही स्वयंचलित स्वच्छतागृहे उभारण्यात आली. यातील सिंहगड रस्ता उड्डाणपूल आणि सेनापती बापट रस्त्यावरील मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे टाॅयलेट हटविण्यात आली आहेत.

हेही वाचा… पिंपरी : आंदोलनाच्या गुन्ह्यात खासदार बारणे यांच्यासह चौघे निर्दोष

ई-टाॅयलेटची वैशिष्ट्ये

मानवरहित स्वच्छता आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्ट्ये आहेत. नाणे टाकल्यानंतरच स्वच्छतागृहाचा वापर करता येतो. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे केली जाते. साफसफाई झाली नाही, तर स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. देशातील अनेक शहरांत या प्रकारच्या टाॅयलेटची उभारणी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांकडून निषेध

करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेली ई-टाॅयलेट बंद असल्याने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत. अभिजीत वारवकर यांनी त्याबाबत आवाज उठविला असून, प्रत्येकी २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली टाॅयलेट सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.