पुणे : दक्षिणेकडील राज्यांत नारळाची लागवड कमी प्रमाणात झाल्याने चार महिन्यांपासून नारळ, तसेच गोटा खोबर्‍याचे दर तेजीत आहेत. दिवाळीत खोबर्‍याला मागणी वाढली असल्याने पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये एक किलो खोबर्‍याचे भाव ५०० रूपयांपर्यंत पोहोचले आहेत.

दिवाळीत लागणार्‍या वाण सामानाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहेत. हरभरा डाळींसह सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून खोबर्‍याचे दर तेजीत आहेत. दिवाळीत करंजी, चिवड्यासाठी गोटा खोबर्‍याला मागणी असून, किरकोळ बाजारात पावशेर गोटा खोबर्‍यासाठी १२० रुपये मोजावे लागत आहेत. खोबर्‍याचे किलोचे भाव ५०० रूपयांपर्यंत पोहोचले आहे.

‘कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांत पावसामुळे नारळाच्या लागवडीवर परिणाम झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नारळ लागवडीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. दक्षिणेकडील राज्यातून देशभरात नारळ विक्रीस पाठविले जातात. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून नारळाचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात एका नारळाचा भाव प्रतवारीनुसार ४० ते ६० रूपयांपर्यंत आहे’, अशी माहिती मार्केट यार्डातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.

श्रावण महिन्यापासून नारळाच्या मागणीत वाढ झाली. नारळाचे दर तेव्हापासून तेजीत होते. श्रावणानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नारळाच्या मागणीत वाढ होते. दिवाळीपूर्वी नारळाची आवक वाढून दर कमी होतील, असा अंदाज होता. मात्र, नारळाचे दर तेजीत असून, मागणीच्या तुलनेत आवकही कमी होत आहे. दिवाळीत घरगुती ग्राहक, तसेच मिठाई विक्रेत्यांकडून खोबर्‍याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. – दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केट यार्ड.

दक्षिणेकडील राज्यांत झालेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामात नारळाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. नारळाला मागणी जास्त असून, तुलनेत आवक कमी आहे. खोबरे, तसेच नारळाच्या दरात सध्या तरी घट होण्याची शक्यता नाही. दर तेजीत राहणार आहेत. – अशोक लोढा, व्यापारी, मार्केट यार्ड.

बाजारात खोबऱ्याचा तुटवडा

घाऊक बाजारात एक किलो खोबऱ्याचा भाव प्रतवारीनुसार ३३० ते ३५० रुपये आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज ५० ते ६० टन नारळाची आवक होत आहे. दिवाळीत साधारणपणे ७० ते ८० टन नारळाची आवक अपेक्षित असते.

मात्र, पुण्या-मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख बाजार आवारात नारळाची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे नारळ, खोबर्‍याचे भाव तेजीत आहेत. बाजारात खोबऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.