scorecardresearch

मुळशीचे पाणी पुण्याला देण्याचा निर्णय लवकरच; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

यंदा पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. भविष्याचा विचार केल्यास वीजनिर्मिती न केल्यास मुळशीचे पाणी पुण्याकडे वळविता येईल.

मुळशीचे पाणी पुण्याला देण्याचा निर्णय लवकरच; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : मुळशी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती प्रकल्पाची फार आवश्यकता राहिली नसेल, तर टाटा कंपनीला भरपाई देऊन हे पाणी शेती व पिण्यासाठी वापरता येईल, असा पर्याय पुढे आला होता. सन २०१४ ते २०१९ या काळात भाजपचे सरकार होते, तेव्हा हा प्रश्न सुटत आला होता. त्यानंतर आमचे सरकार गेले. आता पुन्हा या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात येणार असून याबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, ‘गेल्या वर्षी मुळशी धरणातून एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पुण्यासाठी वापरण्यात आले. मात्र, यंदा पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. भविष्याचा विचार केल्यास वीजनिर्मिती न केल्यास मुळशीचे पाणी पुण्याकडे वळविता येईल.

हेही वाचा:पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वीजनिर्मिती केल्यानंतर खाली आलेले पाणी उपसा करून पुन्हा पुण्याकडे आणणे हे काम अवघड असून उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वीज पंपांसह अन्य सामग्रीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे मुळशी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती प्रकल्पाची फार आवश्यकता राहिली नसेल, तर टाटा कंपनीला भरपाई देऊन हे पाणी शेती व पिण्यासाठी वापरता येईल. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात येईल आणि याबाबतचा निर्णय लवकरच होईल.’

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:15 IST

संबंधित बातम्या