शिक्षणतज्ञ, स्वयंसेवी संस्थांची ऑनलाइन मोहीम

पुणे : शॉपिंग मॉल, चित्रपटगृह, हॉटेल अशी ठिकाणे संसर्गाच्या दृष्टीने शाळांपेक्षा जास्त जोखमीची आहेत. खूप काळ शाळेबाहेर असलेली लहान मुले अत्यंत आवश्यक अशा सामाजिकीकरणाच्या, स्वत:ला व्यक्त करण्याच्या संधींपासून वंचित राहिल्याने मानसिकदृष्टय़ा तणावात आहेत. त्यामुळे शहरी  भागातील प्राथमिक शाळा त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षणतज्ञ, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्याबाबत ऑनलाइन मोहीम हाती घेतली आहे. 

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. करोनामुक्त भागात जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. तर ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेऊन त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या. मात्र करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यातील काही स्थानिक प्रशासनांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबपर्यंत लांबणीवर टाकला आहे. या पार्श्वभूमीवर प्रथम संस्थेच्या सहसंस्थापक फरिदा लांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुक्मिणी बॅनर्जी, टीच फॉर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शाहीन मिस्री, डॉ. वसंत काळपांडे, हेमांगी जोशी, भाऊ गावंडे, विनिता ताटके आदींनी शाळा सुरू करण्याबाबतची मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्याकडे केली आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये सर्व शाळा सुरू झाल्या असून, महाराष्ट्रासह फारच थोडय़ा राज्यात सर्व शाळा सुरू झालेल्या नाहीत. आरोग्य व्यवस्था पुरेशी बळकट नसणे, कोविडच्या पुढील लाटांचे भय असणे हे चिंतेचे मुद्दे वैध आहेत. पण या चिंता आपल्या पुढील जीवनाचा अनेक महिने, वर्षे एक अविभाज्य भाग असणार आहेत.

अनेक देशांनी भविष्यातील उद्रेकांना तोंड देण्यासाठी त्यांचे विद्यार्थी, नागरिकांवर कठोर निर्बंध लादण्याऐवजी कोविडसोबत जगण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांची धोरणे बनवण्यास, स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यवहार पूर्ववत आणि सुरळीत होण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना लहान मुलांच्या शाळा बंद ठेवण्याचे कोणतेच ठोस कारण दिसत नाहीत. विद्यार्थी त्यांच्या मित्रांना, शिक्षकांना भेटण्यासाठी, सुरक्षित वातावरणात शाळा सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दोन तासांचे आनंदसत्र

शाळा खूप काळ बंद असल्याने मुलांच्या शिकण्याचे झालेले नुकसान प्रचंड आहे. हे नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न पुढे ढकलत राहणे अयोग्य आहे. शाळा पुन्हा उघडल्यानंतर मुलांना शाळेत स्थिरावण्यासाठी दोन तासांचे आनंदसत्र प्रस्तावित करत आहोत. मुलांना शाळेत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधींच्या मदतीने राज्यभर शाळा प्रवेशोत्सव मोहिमेची शिफारस करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.