लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी संबंधित संशोधन केंद्रांनी त्यांच्या प्रतिनिधी, कर्मचारी यांच्यामार्फत विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडे पाठवून पूर्तता करणे आवश्यक असते. मात्र, बहुतेकवेळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यापीठाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक प्रवेश विभागाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात न पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयास, मान्यताप्राप्त संस्थेस प्रचलित नियमांच्या आधारे संशोधन केंद्र मान्य केले आहे. या संशोधन केंद्रामधील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आणि इतर आवश्यक प्रक्रियेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित संशोधन केंद्रांची, पर्यायाने त्या संशोधन केंद्रप्रमुखाची अथवा त्या प्रमुखांनी नेमलेल्या समन्वयकाची असते. मात्र, अनेक संशोधन केंद्रे संशोधक विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी मदत, सुविधा किंवा विद्यापीठातील त्यांच्या इतर कामांसाठी परस्पर विद्यापीठातील संविधानिक अधिकारी, शैक्षणिक प्रवेश विभागात पाठवतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संविधानिक अधिकारी यांचा वेळ वाया जातो, शैक्षणिक प्रवेश विभागाच्या कामकाजात अनेक अडथळे निर्माण होतात, असे नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-अवयवरूपी दानामुळे १८१ जणांना मिळालं जीवदान! मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण सर्वाधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशोधक विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आणि मदत संबंधित संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन केंद्रप्रमुखांनी समन्वयकांना याबाबत तातडीने सूचना देऊन विद्यापीठाच्या पीएच.डी. संदर्भातील सर्व परिपत्रकांचे अवलोकन करून विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. या पुढे पीएच.डी. प्रक्रियेसंदर्भातील प्रशासकीय कामकाजासाठी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे न पाठवता संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख, समन्वयक, प्राधिकृत कर्मचारी यांनाच शैक्षणिक प्रवेश विभागामध्ये पाठवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.