पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किमान ३० जागा ब्राह्मण समाजाला देण्याची मागणी राज्य महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे. समाज भाजपच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत आहे. मात्र, सध्या राज्यात ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची अत्यंत आवश्यकता आहे. राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान ३० जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी.

हे ही वाचा…नशिले शहर !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील कोथरूड, कसबा, चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्यवेळी त्यांची नावे सादर केले जातील. गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत. ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे. ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कायम उभे राहून भाजपला पाठिंबा दिला आहे. भविष्यातही तो पाठिंबा कायम राहील. मात्र, यावेळी उमेदवारी न मिळाल्यास समाजाला आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.