पुणे : नगर रस्त्यावर ट्रकचालकाने अचानक ट्रक वळविल्याने झालेल्या अपघातात मोटारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वाघोलीतील गाडेवस्ती चौकात अपघात झाला. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
युवराज चंद्रकांत पाटील (वय ३७, रा.डुडुळगाव, आळंदी-मोशी रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. याबाबत अनिरुद्ध अरुण पाटील (वय २८, रा. डुडुळगाव, आळंदी-मोशी रस्ता) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक युवराज पाटील हे नगर रस्त्याने निघाले होते. वाघोलीतील गाडेवस्ती चौकात शनिवारी (७ जून) दुपारी चारच्या सुमारास ट्रकचालकाने अचानक ट्रक वळविला. पाठीमागून येणारे मोटारचालक युवराज पाटील यांची मोटार ट्रकवर आदळली. अपघातात पाटील यांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करत आहेत.