पुणे : दुबईतून एका खासगी विमान कंपनीने गुरुवारी पहाटे पुण्यात उतरलेल्या १४० प्रवाशांच्या पिशव्या आणि अन्य साहित्य दुबईतच राहिल्याचा प्रकार घडला. संबंधित कंपनीशी संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.
दुबईहून बुधवारी रात्री निघून पुण्याला येणाऱ्या विमानाला उड्डाणाला सुमारे दोन तास उशीर झाला. मध्यरात्री १२ ला निघणारे हे विमान गुरुवारी पहाटे दोन वाजता दुबई विमानतळावरून पुण्याच्या दिशेने झेपावले. ते गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानातील १४० प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या पिशव्या आणि अन्य साहित्य मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी विमान कंपनीकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांना त्यांच्या पिशव्या आणि अन्य साहित्य दुबई विमानतळावरच राहिल्याचे समजले.
‘प्रवाशांपैकी अनेकांच्या सामानात अत्यावश्यक वस्तू होत्या. विमानतळ व्यवस्थापन विभागाने संबंधित विमान कंपनीच्या तक्रार निवारण केंद्रावर संपर्क साधला. परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही,’ असे विमानातील प्रवाशांपैकी एका महिलेच्या पतीने समाजमाध्यमात नमूद केले. त्यानंतर संबंधित कंपनीच्या समाजमाध्यमावरील अधिकृत खात्यावरून प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली. याबाबत विमानतळ प्रशासनातील व्यवस्थापकीय संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.