पुणे : उन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये विषाणुसंसर्गाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत ताप, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

यंदा उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर तापमानात अचानक घट होऊन ढगाळ हवामान झाले. आता अवकाळी पाऊस सुरू असून, हवामान बिघडले आहे. अशा प्रकारचे हवामान हे विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे विषाणुसंसर्गाच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांच्यात या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांमध्ये ताप, उलट्या आणि जुलाब ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत.

याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले की, सध्या हवा खराब असल्याने लहान मुलांमध्ये विषाणुसंसर्ग वाढला आहे. मुलांना ताप आल्यानंतर तो ४ ते ५ दिवस राहतो. या काळात त्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये आणि त्यांना मास्क वापरण्यास द्यावा. ढगाळ हवामानामुळे मुलांना तहान लागत नाही. अशा वेळी त्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्यावे. अलीकडे रस्त्यांवरील खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण फार वाढले आहे. हे पदार्थ बनविताना स्वच्छतेची पुरेशी काळजी न घेतल्यास ते खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. मुले आजारी पडल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आहारावर लक्ष द्यावे

मुलाच्या आहाराच्या सवयींकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यावे. मुलांना ताजी फळे, भाज्या, तृणधान्ये, काजू आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार द्यावा. पालकांनी मुलांना जंक फूड, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ देणे टाळावे. उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन टाळावे कारण त्यामुळे विषबाधा होऊ शकते. मुलांना लिंबू-पाणी, ताक किंवा नारळ पाणी प्यायला द्यावे. मुलांना बेकरी उत्पादने, मिठाई आणि गोड पदार्थांपासून दूर ठेवावे, असा सल्ला मदरहूड हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ इंशारा महेदवी यांनी दिला.

लक्षणे

– मळमळ आणि उलट्या

– पोटात कळ येणे

– जुलाब किंवा अतिसार

– ताप येणे

– भूक न लागणे

– थकवा किंवा अशक्तपणा

– तोंड कोरडे पडणे

पालकांनी काय काळजी घ्यावी?

– मुलांच्या हातांची स्वच्छता राखावी.

– मुलांना शिळे अन्न देऊ नये.

– बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत.

– भरपूर पाणी पिण्यास द्यावे.

– गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास द्यावा.

– लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवावे.