पुणे : मोठा गाजावाजा करत शहरात उभारण्यात आलेली बहुतांश ई-टॉयलेट्स बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. देखभाल दुरुस्तीची निविदा काढल्यानंतरही ई-टॉयलेट्स बंद असून त्यांची दुरवस्थाही झाली आहे. महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या शहरात आधीच कमी असताना या योजनेत महिलांसाठी बारा ई-टॉयलेट सुरू करण्यात आली होती. मात्र त्यांचीही पूर्णत: दुरवस्था झाली आहे. दरम्यान, ई- टॉयलेट्सच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका खासगी कं पनीला देण्यात आले असून टॉयलेट सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता लक्षात घेत गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार विकास निधीतून शहरात अत्याधुनिक आणि स्वयंचलित ई-टॉयलेट्सची उभारणी करण्यात आली आहे. शहरात सध्या चौदा ठिकाणी स्वयंचलित ई-टॉयलेट्स आहेत. या अत्याधुनिक ई-टॉयलेट्सचे व्यवस्थापन आणि देखभाल दुरुस्तीचे काम एका खासगी कं पनीला देण्यात आले होते. करोना संसर्ग कालावधीत या कं पनीबरोबरच करार संपला आणि त्यानंतर ई-टॉयलेट बंद पडली.  ई-टॉयलेटचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जात असले, तरी टापटीप, सुरक्षितता, अत्याधुनिक सुविधा आदी कारणांमुळे टॉयलेटचा वापरही वाढला होता. विशेषत: महिलांकडूनही त्याचा मोठा वापर होत होता.

नव्या कराराअभावी ई-टॉयलेटच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्याच संस्थेला पुन्हा देण्यात आले. मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणची ई-टॉयलेट बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. अनेक ई-टॉयलेटमधील कॉइन बॉक्सची मोडतोड करण्यात आली असून

काही ठिकाणी पायाभूत

सुविधांचीही कमतरता आहे. त्यामुळे ई-टॉयलेटही वापराविना पडून राहिली आहेत.दरम्यान, या संदर्भात महापालिके कडे विचारणा के ली असता टॉयलेट बंद असल्याची कबुली देण्यात आली. मात्र त्याबाबतचा करार नव्याने झाला असून काही ठिकाणी ही सुविधा सुरू झाली आहे. मात्र नागरिकांकडून त्याचा वापर होत नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

चौदा ठिकाणी टॉयलेट

जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, मॉडेल कॉलनी, हिरवाई गार्डन, भैरोबा नाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर येथील मावळे आळी, विमाननगर, राजाराम पूल, नीलायम चित्रपटगृह, वाडिया महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता येथे ही स्वच्छतागृहे आहेत. शहरात प्रथमच या प्रकारच्या स्वच्छतागृहांची उभारणी महापालिके कडून करण्यात आली होती. यातील बारा स्वच्छतागृहे महिलांसाठी असून दोन स्वच्छतागृहे पुरुषांसाठी आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर या टॉयलेटची शहरात उभारणी करण्यात आली आहे.

ई-टॉयलेटची वैशिष्टय़े

मानवविरहित स्वच्छता आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े आहेत. नाणे टाकल्यानंतरच स्वच्छतागृहाचा वापर करता येतो. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे के ली जाते. साफसफाई झाली नसेल तर स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. देशातील अनेक शहरांत या प्रकारच्या टॉयलेटची उभारणी करण्यात आली आहे. अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र रॅम्प आणि लोखंडी बारची व्यवस्था आहे.