पुणे : सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. देबरॉय सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, केंद्र सरकारच्या नीती आयोगाचेही ते सदस्य होते.

हेही वाचा >>> पुणे : गर्भवतींच्या तपासणीवर महापालिकेचा भर, झिका संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ४१ जणींचे नमुने एनआयव्हीला पाठवले

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था ही देशातील नामांकित शिक्षण संस्था आहे. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. अर्थशास्त्र, आर्थिक धोरणे, शासकीय योजना, विविध प्रकारची सर्वेक्षणे यात गोखले संस्थेचे महत्त्वाचे योगदान दिले जाते. १९८३-८७ या कालावधीत डॉ. देबरॉय गोखले संस्थेत कार्यरत होते. त्यानंतर आता सुमारे चाळीस वर्षांनी त्यांची कुलपतीपदी नियुक्ती झाली आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. अर्थशास्त्र आणि धोरण निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. संशोधनपर लेखन आणि भाषांतराच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रातही विपुल काम केले आहे. त्यांना केंद्र सरकारकडून २०१५मध्ये प्रतिष्ठेच्या पद्माश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याशिवाय भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे सर आर. जी. भांडारकर स्मृती पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. या पूर्वी त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष, डेक्कन कॉलेजचे कुलपती अशा अनेक जबाबदाऱ्या निभावल्या आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थशास्त्र संशोधन, धोरण निर्मितीमध्ये मोठा अनुभव असलेल्या डॉ. देबरॉय यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वात गोखले संस्था यशाची नवी शिखरे पादाक्रांत करेल याची खात्री आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात याच संस्थेतून झाली होती, याचा अभिमान आहे. – डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले संस्था